Omicron Variant : चिंताजनक! मुंबईत ओमायक्रॉनचे तीन नवीन रुग्ण; धारावीत विशेष खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:56 PM2021-12-10T19:56:52+5:302021-12-10T19:57:34+5:30

Omicron Variant : परदेशातून आलेल्या सुमारे पाच हजार ३९२ प्रवाशांची आतापर्यंत कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २४ प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कातील नऊ जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे.

Three new Omicron patients in Mumbai; Special caution in Dharavi | Omicron Variant : चिंताजनक! मुंबईत ओमायक्रॉनचे तीन नवीन रुग्ण; धारावीत विशेष खबरदारी

Omicron Variant : चिंताजनक! मुंबईत ओमायक्रॉनचे तीन नवीन रुग्ण; धारावीत विशेष खबरदारी

Next

मुंबई - मागील आठवड्यात परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे शुक्रवारी उजेडात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत, तरीही खबरदारी म्हणून त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एक रुग्ण गुजरात येथील रहिवाशी आहे, तर दुसरा धारावीमध्ये वास्तव्यास आहे. दरम्यान, मुंबईतील ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

परदेशातून आलेल्या सुमारे पाच हजार ३९२ प्रवाशांची आतापर्यंत कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २४ प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कातील नऊ जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला तरुण आणि अमेरिकेतील तरुणी यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे मागील आठवड्यात उजेडात आले. सुदैवाने त्यांच्या संपर्कातील ४० लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत. ३७ वर्षीय या तरुणाचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला बुधवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, पुणे येथील प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेसिंगमध्ये शुक्रवारी आणखी तीन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 

हे आहेत ते तीन प्रवाशी... 
- टांझानिया येथून ४ डिसेंबर रोजी मुंबईत आलेल्या धारावीतील रहिवाश कोरोना बाधित असल्याने त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कातील दोघांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. 
- लंडन येथून १ डिसेंबर रोजी भारतात आलेल्या २५ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णाने लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. त्याच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींना कोविडची लागण झालेली नाही. 
- गुजरातचा रहिवासी असलेला ३७ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी मुंबईत आला आहे. त्यांनी लस घेतली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला सौम्य लक्षणे आहेत. 

धारावीत विशेष खबरदारी.... 
आशियातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोविडचा प्रसार पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही नियंत्रणात ठेवण्यात महापालिकेला यश आले आहे. येथील धारावी पॅटर्नची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे याच भागातील रहिवाशी ओमायक्रॉन ग्रस्त आढळून आल्याने या ठिकाणी तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सध्या या भागातील सक्रिय रुग्णांची संख्या सात आहे. 
 

Web Title: Three new Omicron patients in Mumbai; Special caution in Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.