मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली, जोगेश्वरी आणि वांद्रे स्थानकातील पादचारी पुलाचे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील गर्दी विभागली जाणार असून, याचा लाभ प्रवाशांना होईल.जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या कमी होऊन, अपघातदेखील कमी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, कांदिवली स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढल्याने, स्थानकात अतिरिक्त पुलाची मागणी प्रवासी करत होते. त्यानुसार कांदिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पूल वापरात आल्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या पुलांवरील गर्दी विभागली जाईल.वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील पादचारी पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामानंतर वांद्रे पूर्वेकडील पुलाला पादचारी पूल जोडण्यात येईल. यामुळे पूर्वेकडील प्रवाशांना फायदा होईल. स्थानकातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या पादचारी पुलावरील ताण कमी होईल.कांदिवली, जोगेश्वरी आणि वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक ६ आणि ७च्या पादचारी पुलाच्या विस्तारीकरणाचे काम आॅक्टोबरअखेर पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर, लगेचच पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक कन्हैया झा यांनी सांगितले.प्रवाशांना दिलासाकांदिवली, जोगेश्वरी आणि वांद्रे स्थानकात सकाळ तसेच संध्याकाळी स्थानकांवर प्रचंड गर्दी होत असल्याने पूल अपुरे पडत आहेत. परंतु आता नव्या पुलांचे काम मार्गी लागणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.
आॅक्टोबरअखेर पश्चिम रेल्वेवर तीन नवे पादचारी पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 6:15 AM