ट्रॉमा केअर सेंटरप्रकरणी तीन परिचारिका निलंबित, एका डॉक्टरची सेवा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:43 AM2019-02-15T05:43:25+5:302019-02-15T05:46:28+5:30
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रूग्णांना अंधत्व आल्याच्या प्रकरणात जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरच्या तीन परिचारिकांना निलंबित तर एका डॉक्टरची सेवा खंडित करण्यात आली आहे.
मुंबई : मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रूग्णांना अंधत्व आल्याच्या प्रकरणात जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरच्या तीन परिचारिकांना निलंबित तर एका डॉक्टरची सेवा खंडित करण्यात आली आहे. दोन डॉक्टरांची खात्यातंर्गत चौकशी केली जाणार आहे. अधिष्ठाता यांचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही कारवाई केली आहे.
ट्रॉमा सेंटरमध्ये २५ जानेवारी रोजी सात रूग्णांच्या डोळ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसगार्मुळे पाच जणांना दृष्टी गमवावी लागली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल नाकारून आयुक्त मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांना नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल कुंदन यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तांना सादर केला होता.
त्यानुसार तीन परिचारिकांना निलंबित करून नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या एका डॉक्टरची सेवा थांबवण्यात आली आहे. त अजून दोन डॉक्टरांची व रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ हरबनसिंह बावा यांचीही खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. कूपर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे हे काम करण्यास पात्र आहेत की नाहीत याचीही चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.