मिल्ट्री इंजिनीअरिंगचे तीन अधिकारी जाळ्यात; ८० लाखांचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:54 AM2024-04-14T11:54:08+5:302024-04-14T11:54:38+5:30
सुमारे ८० लाख रुपयांची ही निविदा एका खासगी कंपनीला देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मिल्ट्री इंजिनीअरिंग विभागाच्या कार्यालयाला गुणवत्ताहीन फर्निचरचा पुरवठा केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीसह सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मिल्ट्री इंजिनिअरिंग सेवेच्या (एमईएस) तीन अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी ‘एमईएस’च्या पुणे विभागातील कार्यालयासाठी फर्निचरची खरेदी करायची होती. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. सुमारे ८० लाख रुपयांची ही निविदा एका खासगी कंपनीला देण्यात आली.
याकरिता काही अटी व शर्तीदेखील निश्चित करण्यात आल्या होत्या. यातील प्रमुख अटीनुसार हे फर्निचर संबंधित कंपनीने बनवून देणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कंपनीने आणखी एका कंपनीकडून फर्निचरची खरेदी करत ते फर्निचर ‘एमईएस’ला दिले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जे फर्निचर पुरवण्यात आले ते गुणवत्ताहीन होते. या फर्निचरच्या गुणवत्तेसंदर्भात २०१९ मध्ये तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाने त्या फर्निचरसाठी वापरलेल्या लाकडाची चाचणी एका प्रयोगशाळेतून करून घेतली. त्यावेळी फर्निचरसाठी वापरलेले लाकूड हे निलगिरीच्या झाडाचे असून, ते फारसे दमदार नसल्याचे आढळले.
हे फर्निचर तपासून स्वीकारण्याची जबाबदारी ‘एमईएस’च्या ३ अधिकाऱ्यांवर होती, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे. संबंधित खासगी कंपनीचा पदाधिकारी, अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.