चार मूत्रपिंड, तीन यकृतांसह एका हृदयाचे प्रत्यारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या तीव्र संक्रमण काळातही मुंबईत पाच दिवसांत तीन अवयवदान पार पडले. मार्च महिन्यात ६ मार्च रोजी चार मेंदूमृत रुग्णांच्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळाले. तर नुकतेच मागील पाच दिवसांत तीन अवयवदान झाल्याची माहिती मुंबई जिल्हे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.
मुंबईतील ग्लोबल, वाॅकहार्ट आणि नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात अवयवदान पार पडले. यात दोन अवयवदानात एका १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या तीन अवयवदानात चार मूत्रपिंड, तीन यकृत आणि एका हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात डॉक्टर, रुग्णालय प्रशासन यांनी उत्तम जबाबदारी पार पाडून अवयवदान यशस्वीपणे पार पाडल्याची माहिती मुंबई जिल्हे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस.के. माथुर यांनी दिली.