मुंबई : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने धारावी परिसरातील म्हाडाच्या घरांमध्ये घुसखोरी करत या घरांची विक्री करणाऱ्या तिघा जणांना धारावी पोलिसांनी अटक केली. गेल्या काही वर्षांत अनेकांना त्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला असून त्यानुसार पोलीस तिघांची कसून चौकशी करत आहेत. नवी मुंबई परिसरात राहणारे मोहम्मद जुबेर यांना धारावी परिसरात भाड्याचे घर हवे होते. त्यानुसार त्यांनी वर्षभरापूर्वी एका एजंटला गाठून घर शोधण्यासाठी सांगितले होते. या एजंटने जुबेर यांची युसूफ चौधरी, उस्मान शेख आणि कार्तिक या तिघांसोबत भेट घालून दिली. या माफियांनी जुबेर यांना भाड्याने घर घेण्याऐवजी केवळ तीन लाखांत स्वत:चे घर मिळवून देतो, असे आश्वासन दिले. इतक्या कमी किमतीमध्ये घर मिळत असल्याने जुबेर यांनीदेखील तत्काळ होकार दर्शवत त्यांना तत्काळ ३ लाख रुपये दिले. त्यानंतर या माफियांनी धारावी परिसरातील म्हाडाच्या इमारतीमधील एका खोलीचे कुलूप तोडून ही खोली जुबेर यांना दिली. तसेच बनावट पेपरदेखील बनवून दिले. मात्र जुबेर यांना देण्यात आलेल्या घरामध्ये पाणी येत नसल्याने त्यांनी तशी तक्रार या माफियांकडे करताच त्यांना दुसरे घर देण्यात आले. या वेळी या माफियांनी त्यांना दिलेले बनावट पेपरदेखील जुबेर यांच्याकडून काढून घेतले. त्यानंतर पेपरसाठी जुबेर यांनी त्यांच्याकडे अनेकदा मागणी केली. मात्र त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. मात्र काही दिवसांपूर्वी जुबेर कुटुंबीयांसह बाहेर गेलेले असताना या माफियांनी जुबेर यांचे कुलूप तोडून त्यांचे कुलूप या घराला लावले. ही बाब जुबेर यांना समजताच त्यांनी या दलालांना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून धमकी देण्यात आल्याने जुबेर यांनी याबाबत धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी या आरोपींना अटक केली असून या रॅकेटमध्ये आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
म्हाडाची घरे बळकाविणाऱ्या तिघा जणांना अटक
By admin | Published: May 01, 2016 2:25 AM