मुंबई : विक्रोळीच्या पार्कसाइट परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या सिलिंडरस्फोटात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मोहम्मद सलीम बेलीम (८), मिराज सलीम बेलीम (१५) आणि सलमा सलीम बेलीम (४०) अशी मृतांची नावे असून, या दुर्घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.परिसरातील लास्ट बस स्टॉप रोड नंबर ३वर गादीचे दुकान असून, दुकानावरील मजल्यावर बेलीम कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वन प्लस वन असे बांधकाम असलेल्या गादीच्या दुकानात शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे दुकानाला आग लागली. या आगीमुळे दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घरात सिलिंडरस्फोट झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या. अथक प्रयत्नांती अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी ६ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जखमी झालेल्या दोन मुलांसह महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाल्याचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विक्रोळीतील सिलिंडरस्फोटात ३ जणांचा मृत्यू
By admin | Published: February 07, 2016 4:09 AM