लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: खंडणीप्रकरणी शहरातील दोन व्यावसायिक अहमदराजा अफरोज वधारिया, अश्फाक टॉवेलवाला आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर यांची शुक्रवारी मुंबई विशेष न्यायालयाने सुटका केली. ते पाच वर्षे कारागृहात होते. या प्रकरणातील फिर्यादी एक बिल्डर आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि अन्य वस्तूंची आयात करत असे. फिर्यादी आणि टॉवेलवाला यांचा एकच व्यवसाय असल्याने फिर्यादी टॉवेलवाला यास ओळखतो. एका व्यवहारात टॉवेलवाला याला फिर्यादींना १५.५ लाख रुपये द्यायचे होते. मात्र, त्याने ते देण्यास टाळाटाळ केली. याबाबत ज्या दिवशी विचारणा केली त्याचदिवशी फिर्यादीला आंतरराष्ट्रीय फोन कॉल आला. हा कॉल दाऊदच्या वतीने फहीम मचमचवाला याने केला होता. मचमचवाला याने फिर्यादींना धमकावले आणि टॉवेलवाला, वधारिया यांच्याकडून पैसे न मागण्यास सांगितले.
वधारिया आणि टॉवेलवाला मित्र असून त्यांची मैत्री दाऊदचा पुतण्या रिझवान कासकर यांच्याशीही होती. रिझवानेच दोघांचा संपर्क दाऊदशी करून दिला, असे सरकारी वकिलांचे म्हणणे होते. वधारिया याने दुसऱ्या दिवशी तक्रारदाराला पुन्हा फोन कॉल केला आणि फहीम मचमचवाला याने जी धमकी दिली होती, तीच धमकी पुन्हा दिली, असे तक्रारदारांना सांगितले.
त्यावरून रिझवान कासकर, अहमदराजा अफरोज वधारिया आणि अश्फाक टॉवेलवाला यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि फहीम मचमचवाला याला फरारी आरोपी दाखविण्यात आले. कोरोना काळात फहीमचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात ‘मकोका’ लावण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी आरोपींची सुटका केली.