Join us

बार्ज दुर्घटनेप्रकरणी पापा शिपिंग कंपनीच्या संचालकासह तिघा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:05 AM

दीड महिन्यानंतर कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते वादळावेळी समुद्रात बार्ज बुडून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी दीड महिन्यानंतर मुंबई ...

दीड महिन्यानंतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते वादळावेळी समुद्रात बार्ज बुडून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी दीड महिन्यानंतर मुंबई पोलिसांनी पापा शिपिंग कंपनीच्या संचालकासह तिघा जणांना अटक केली आहे. कंपनीचा संचालक नितीनकुमार दीनानाथ सिंह (वय ३२, रा. नालासोपारा), व्यवस्थापक प्रसाद गणपत राणे (वय ४६, रा. चेंबूर) व टेक्निकल सुपरिटेंडंट अखिलेश्वर तिवारी (४९, रा. विले पार्ले) अशी त्यांची नावे असून, त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. यलो गेट पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे.

१७ मे रोजी अरबी समुद्रात ओएनजीसी हिरा फिल्ड भागात पापा-३०५ हे बार्ज बुडून ही दुर्घटना झाली होती. त्यामध्ये ७४ कर्मचाऱ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तर अद्याप ८ कर्मचारी बेपत्ता आहेत. वादळामुळे उद्भविणारे संकट लक्षात न घेता बार्जमधील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी कॅप्टन राकेशकुमार बल्लव (५२, रा. पाटणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेतून वाचलेल्या बार्जचे चीफ इंजिनीअर मुस्तफीजूर रेहमान हुसेन शेख यांच्या फिर्यादीवरून यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वादळाच्या तडाख्यात एचटी प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या ‘पापा ३०५’ हे अकोमेडशन वर्क बार्जचे सर्व ८ अँकर्स तुटून समुद्रात बुडाले होते, त्या वेळी बार्जमध्ये २६१ कर्मचारी होते. भारतीय नौदल, तटरक्षक दल, व्यापारी जहाजे यांनी शोधमोहीम राबवून १८६ कर्मचाऱ्यांना वाचविले होते तर ७५ बेपत्ता झाले. मिळालेले कर्मचारी व ७१ मृतदेह नौदल व तटरक्षक दलाच्या जहाजातून मुंबईत आणण्यात आले.

७१ मृतदेहांपैकी ४ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पापा ३०५ बार्जवरील ८ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्रासह गोवा, दमन, गुजरात सागरी किनाऱ्यावर सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बंदर विभागाचे साहाय्यक आयुक्त अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तपास करीत आहे.

पापा-३०५ बार्ज हे ड्ररमास्ट एंटरप्रायजेस कंपनी, सेशल्स यांच्या मालकीचे असून, ते अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भाडेकरारावर घेतले होते. त्याच्या वतीने जहाजावर सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ७१ मृतदेहांपैकी ६६ हे पापा-३०५ बार्ज व वरप्रदा टग दुर्घटनेतील १ कर्मचारी होता.

डीएनएवरून मृतदेहांची ओळख

पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या ४२ नातेवाइकांचे रक्ताचे नमुने घेतले होते. डीएनए तपासणीसाठी कलिना येथील प्रयोगशाळेत ते पाठविले आहेत, त्याच्या अहवालातून १४ मृतदेह संबंधित नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत. इतरांचा अहवाल यायचा आहे.