ठाणे : गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात सावरकरनगर येथील म्हाडा वसाहतीमधील आराधना सोसायटीमध्ये राहणाऱ्या संपदा भोसले (४६) यांच्यासह त्यांची दोन मुले अनुक्रमे सुयश (१८) आणि सिद्धेश (२०) यांच्या अंगावर घराचे लोखंडी पत्रे पडल्याने तिघे जखमी झाले आहेत.भोसले यांनी घराच्या पत्र्यांवर कौले बसविली होती. परंतु, पत्र्यांना आधार देण्यासाठी बसविण्यात आलेले लोखंडी अँगल तुटून ते खाली कोसळले. या घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपदा यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला असून सुयशच्या डोक्याला टाके पडले आहेत, तर विजेचा धक्का लागल्याने सिद्धेश जखमी झाला आहे. दरम्यान, दुपारी ३ च्या सुमारास ठाणे पूर्वेला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलाच्या प्लास्टरचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. तसेच तो वाहतुकीसाठी सुरूही ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या कालावधीत सुमारे २० तक्रारी प्राप्त झाल्या असून यात दोन आगीच्या, शॉर्टसर्किटची एक, झाडे पडल्याच्या ७, फांद्या पडल्याच्या २ आणि इतर ८ प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
छताचे पत्रे कोसळून ठाण्यात तिघे जखमी
By admin | Published: June 12, 2015 10:55 PM