लाच स्वीकारताना तिघांना अटक
By admin | Published: January 19, 2015 09:47 PM2015-01-19T21:47:38+5:302015-01-19T21:47:38+5:30
महाड तालुक्यातील शिवथर घळ येथे बांधलेल्या समाज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा चेक देण्यासाठी ही ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.
अलिबाग : महाड तालुक्यातील शिवथर घळ येथे बांधलेल्या समाज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा चेक देण्यासाठी ही ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या महाड उप विभागातील सहाय्यक अभियंता कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी अविनाश विलास कांबळे आणि दलाल राजकुमार वसंत रेवणे या दोघांना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महाड येथे २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली.
याच लाच प्रकरणातील अलिबाग येथील वरिष्ठ अभियंता कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी प्रवीण भास्कर तुरे याला येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली.
शिवथर घळ येथे एका न्यासाच्या माध्यमातून बांधलेल्या समाज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा चेक न्यासाला जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून येणे होता. तो चेक मिळवून देतो असे महाड तालुक्यातील कोंझरी येथे राहाणारा दलाल राजकुमार वसंत रेवणे याने न्यासाच्या विश्वस्तांना सांगितले. त्या चेकसाठी ४० हजार रुपयांची मागणी महाड येथील तृतीय श्रेणी कर्मचारी अविनाश कांबळे, दलाल राजकुमार रेवणे व अलिबाग येथील वरिष्ठ अभियंता कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी प्रवीण तुरे यांनी संगनमतातून केली. या संदर्भातील रीतसर तक्रार शनिवारी रायगड लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात दाखल झाल्यावर, लाचेची रक्कम लाचखोरांनी २१ हजार रुपये असल्याचे सांगितले.
सोमवारी तात्काळ महाड येथील उपअभियंता कार्यालयामागील कँटीनमध्ये रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कलगुटकर आणि महिला पोलीस निरीक्षक यास्मिन इनामदार यांच्या पथकाने सापळा रचून दुपारी ३.४५ वाजता महाड येथील तृतीय श्रेणी कर्मचारी अविनाश कांबळे आणि दलाल राजकुमार रेवणे हे दोघे लाच घेताना रंगेहाथ सापडले, तर याच लाच प्रकरणाशी संबंधित अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयातील प्रवीण तुरे यालाही अटक केल्याचे कलगुटकर यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
२१ हजारांची कबुली
४शिवथर घळ येथे एका न्यासाच्या माध्यमातून बांधलेल्या समाज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा चेक न्यासाला जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून येणे होता.
४चेक मिळवून देतो असे कोंझरी येथे राहणारा दलाल राजकुमार वसंत रेवणे याने न्यासाच्या विश्वस्तांना सांगितले.
४चेकसाठी ४० हजार रुपयांंची मागणी महाड येथील तृतीय श्रेणी कर्मचारी अविनाश कांबळे, दलाल राजकुमार रेवणे व अलिबाग येथील वरिष्ठ अभियंता कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी प्रवीण तुरे यांनी संगनमतातून केली.