नालासोपारा/मुंबई : वसई ते नायगावदरम्यान सोमवारी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा एक सहकारी साहित्य आणण्यासाठी गेल्याने दुर्घटनेतून बचावला.
रूळ दुरुस्तीचे काम असताना लोकल आली. मात्र ती कोणत्या मार्गावर येईल, याबाबत कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला आणि धडक बसून भाईंदर विभागाचे अभियंता वासू मित्रा (वय ५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (३७), सहायक सचिन वानखेडे (३७) यांचा मृत्यू झाला; तर सहायक चिमणलाल साहित्य आणण्यासाठी गेल्याने दुर्घटनेतून बचावला. वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली.
रेल्वेने तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५५ हजारांची मदत जाहीर केली. १५ दिवसांच्या आत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके दिली जाणार आहेत. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला अंदाजे ४० लाख रक्कम मिळेल; तर वासू मित्राच्या कुटुंबाला १.२४ कोटी या रकमेव्यतिरिक्त, सेटलमेंटची रक्कम दिली जाईल.
रेडियम जॅकेट नव्हतेरात्री काम करताना रेल्वे कर्मचाऱ्यांना रेडियम जॅकेट घालणे बंधनकारक आहे. अपघातग्रस्त तिघांनी जॅकेट घातले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.