मुंबई : ‘फ्रेंडशिप डे’च्या पूर्व संध्येला दादर चौपाटीवर मौजमस्ती करून निघत असताना बुडणा-या मित्राला वाचविण्यासाठी अन्य दोघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तिघांचेही बुडून मृत्यू होण्याची हदयद्रावक घटना शनिवारी घडली.तिघेही दादरच्या महापालिका वुलन मिल माध्यमिक शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होते. अनुप जयप्रकाश यादव (१७), रोहीत जयप्रकाश यादव (१६), भरत हनुमंता (१६) अशी तिघांची नावे आहेत. यादव हे दोघे सख्खे भाऊ आहेत. सकाळी तिघेही नेहमीप्रमाणे शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ११.१५ वाजता तिघांनी दादर चौपाटी गाठली. तिथे ते कबड्डी खेळले. निघताना अंगाला वाळू लागल्याने भरत पुन्हा पाण्यात गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याने मदतीसाठी आवाज दिला. अनुपने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. दोघे बुडत असल्याचे पाहून रोहितही पाण्यात उतरला. एकाला वाचविण्याच्या नादात तिघेही पाण्यात बुडाले.फ्रेंडशिप डेला रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तिघांनीही शनिवारी दादर चौपाटीवर फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे ठरवले होते. या प्रकरणी माहिम पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरू असल्याचे माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद इदेकर यांनी सांगितले.
मित्राला वाचविण्याच्या नादात तिघे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 5:18 AM