मुंबई : जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड-किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवडी किल्ला येथे गड-किल्ल्यांच्या राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ फडणवीस यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम कौशल्य विकास विभागाअंतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
नेत्यांसह अभिनेत्यांनीही हाती घेतला झाडू
मुंबईत गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेची सुरुवात केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी ही मोहीम पार पडली.
पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल कोबी, कोस्टगार्डचे कैलाश नेगी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची यावेळी उपस्थिती होती.