Join us

VIDEO : धावत्या कारमधून तरुणांची स्टंटबाजी; पोलिसांकडून कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:04 PM

पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांची कार जप्त केली आहे.

मुंबई : अनेक तरुणांना आपल्या जीवाची पर्वा नसते, त्यामुळे कार, ट्रेन किंवा बाईकवर स्टंटबाजी करताना दिसतात. या स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची स्टंटबाजी करण्याची घटना मुंबईतील कार्टर रोड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. तीन तरुण धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर डोकावून स्टंटबाजी करत होते. याप्रकरणी पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांची कार जप्त केली आहे. 

ही घटना 7 जून रोजी घडली असून तीन तरुण कार्टर रोडवर धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर डोकावून स्टंटबाजी करत होते. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी 8 जूनला अटक केली आहे. याचबरोबर, पोलिसांनी या तीन तरुणांनी स्टंटबाजी करण्यासाठी वापरलेली कार सुद्धा जप्त केली आहे. 

स्टंटबाज म्हाडा कॉलनीत राहणारेमोहम्मद सुलतान शेख (20), समीर सहीबोले (20) आणि अनस शेख (19) अशी स्टंट करणाऱ्या तरुणांची नावे आहे. हे तरुण कॉर्मसचे विद्यार्थी आहेत. तसेच, गोवंडी येथील म्हाडा कॉलनीत राहतात. त्यांचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर भा.दं. वि. कलम 279, 339 आणि 184 नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या मुलांवर कारवाई गेल्या महिन्यात हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडी रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंटबाजी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली होती. ही दोन अल्पवयीन मुले हार्बर मार्गावरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या चालत्या लोकलमधून हातपाय बाहेर काढून स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मुलांचा कृत्यामुळे त्यांचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलांविरोधात १२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासले. ८ मे रोजी वडाळा रोड ते शिवडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही मुले स्टंटबाजी करताना आढळून आली होती.  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी