Join us

मतमोजणीच्या राड्यात तीन पोलीस जखमी

By admin | Published: February 25, 2017 5:03 AM

गोवंडीतील एम पूर्व प्रभागात समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने या प्रभागात झालेली निवडणूक रद्द करून फेरमतदानाच्या मागणीचा जोर वाढल्याने या परिसरात

मुंबई : गोवंडीतील एम पूर्व प्रभागात समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने या प्रभागात झालेली निवडणूक रद्द करून फेरमतदानाच्या मागणीचा जोर वाढल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये राज्य राखीव बल गट क्र. ७चे पोलीस उपनिरीक्षक मधुकर जाधव, गट क्र. १०चे पोलीस शिपाई मंगेश हनुमंत यांच्यासह देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विश्वनाथ राणे (५३) आणि राजकुमार हे गंभीर जखमी झाले. गोवंडीतील एम पूर्व वॉर्ड कार्यालयाबाहेर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आल्याची घोषणा होताच, झालेले मतदान रद्द करून फेरमतदान घेण्याची मागणी करणारा अर्ज देण्याच्या बहाण्याने हे उमेदवार आणि पदाधिकारी निवडणूक कार्यालयात शिरले. या उमेदवारांनी थेट पालिका सह आयुक्त आणि उपायुक्तांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व उमेदवार आणि पदाधिकांऱ्याना कार्यालयाच्या बाहेर काढल्याने कार्यकर्त्यांच्या रागात भर पडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अधिक फौजफाटा मागविण्यात आला. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)