‘त्या’ तीन पोलिसांवर खटला चालवा, विशेष न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:08 AM2019-05-17T02:08:08+5:302019-05-17T02:08:36+5:30
वरिष्ठ पोलीस अधिकारी जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक विवेक शेंडे आणि महिला हवालदार एम. ए. भोसले यांना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी समन्स बजाविले.
मुंबई : एका अल्पवयीन मुलीला तिचे लैंगिक शोषण करणा-याशीच विवाह करण्यास जबरदस्ती करणा-या तीन पोलिसांवर खटला चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिला. मुलीच्या वडिलांनी तसा अर्ज विशेष न्यायालयात केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक विवेक शेंडे आणि महिला हवालदार एम. ए. भोसले यांना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी समन्स बजाविले. या तिघांवरही बालविवाह प्रतिबंध कायदा व पॉक्सोअंतर्गत खटला चालविण्यात येईल.
संबंधित अल्पवयीन मुलीचे आरोपींनी २०१२ पासून वारंवार लैंगिक शोषण केले. याविषयी कोणालाही तक्रार केली तर तिच्या वडिलांना व भावाला मारण्याची धमकी त्यांनी मुलीला दिली. अखेरीस २०१३ मध्ये पीडिता आठ महिन्यांची गरोदर असताना ही घटना उघडकीस आली. तिच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपींच्या ओळख परेडसाठी आल्यानंतर तिने आरोपींना ओळखले. मात्र, मकसूद या आरोपीशी विवाह करण्यासाठी पोलिसांनी व शिवसेनेचे नगरसेवक चगेंज मुल्तानी यांनी मुलीला जबरदस्ती केली, असा आरोप पीडितेच्या वकिलांनी अर्जाद्वारे केला.
घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. गुन्हा नोंदविण्याऐवजी पोलिसांनी तिला आरोपीशी विवाह करण्यास जबरदस्ती केली, असे निरीक्षण नोंदवित न्या. मोरे यांनी तिन्ही पोलिसांना समन्स बजाविले.