तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाकडून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:45 AM2018-07-24T04:45:34+5:302018-07-24T04:46:10+5:30
अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमातील तीन अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. युवासेनेने याला कडाडून विरोध करत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे.
युवासेनेचे सदस्य साईनाथ दुर्गे म्हणाले की, कोणतीही पूर्वकल्पना न तसेच चांगली पटसंख्या असतानाही अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याउलट अभ्यासक्रम अद्यावत करण्यासाठी बंद करत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयावरून वातावरण तापले आहे.
एमएच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिव्हिजन स्टडीज आणि फिल्म स्टडीज या अभ्यासक्रमांना एका वर्षासाठी बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे. कुलगुरुंना पत्र लिहून विभागाने याची कल्पना दिली असून अभ्यासक्रम बंद करण्याची कारणे यावेळी देण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने यातील अनेक अभ्यासक्रम जुने असून बदलांची आवश्यकता असल्याचा युक्तीवाद केला आहे. याउलट प्रत्येकी २० विद्यार्थी क्षमता असलेल्या या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक लाख रुपये शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे सुमारे ६० लाखांचा निधीही विद्यापीठाला मिळतो. प्रवेशाअभावी अनेकांना परतावे लागत असताना अभ्यासक्रम बंद करण्यास काहीही अर्थ नसल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे.
संतापजनक बाब
मुंबई विद्यापीठाने नुकताच बृहत आराखड्याच्या माध्यमातून कौशल्यभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे पत्रकारिता विभागाने महत्त्वाचे तीन अभ्यासक्रम बंद करणे ही संतापजनक बाब आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करू, असा इशारा युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी दिला.