मुंबई : कुरियर देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडत दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या तिघांना आजीवन कारावासासह १५ लाख रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यामुळे पुजारी टोळीला आणखी एक जबर धक्का बसला आहे.सहाना कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या अंधेरीतील कार्यालयात १४ मार्च २०११ रोजी कुरियर देण्याच्या बहाण्याने घुसलेल्या गँगस्टर पुजारी टोळीच्या शूटर्सनी कार्यालयात अंदाधुंद गोळीबार करून पळ काढला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सम्राट श्रीकांत देवरशी, योगेश खुळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हत्येसह मोक्कान्वये गुन्हा दाखल करून डी. एन. नगर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र पुजारी टोळीच्या शूटर्सनी खंडणीसाठी दहशत माजविण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याने या गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १कडे सोपविण्यात आला.गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त दिदार सिंग, अरविंद महाबदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश महाले यांच्यासह वंदना नारकर, पोलीस निरीक्षक संतोष बागवे, पोलीस हवालदार अरुण पगारे,पोलीस शिपाई राजेश पाटील यांनी तपास करून आरोपी राजू जाधव, योगेश वाघमारे, खाजप्पा नागोरे, मोहसीन खान, रियाज शेख यांना बेड्या ठोकल्या. हा खटला विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. आणेकर यांच्यासमोर सुरू होता. न्या. आणेकर यांनी आरोपी जाधव, वाघमारे आणिशेख यांना दोषी ठरवत आजीवन कारावास आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा सुनावली.विशेष म्हणजे न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी ५ लाख दंडाची शिक्षा सुनावली असून, आरोपींजवळून दंड वसूल केल्यानंतर ही रक्कम दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना विभागून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
पुजारी टोळीच्या तिघांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 6:00 AM