गणेश चोडणेकर -आगरदांडाजिल्हा परिषदेच्या मुरुड तालुक्यातील सावली - मिठागर नळ पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चूनही मिठागर - सावली - खामदे या तीन गावांच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. २००९ मध्ये रायगड जिल्हा परिषदेने भारत निर्माण योजनेअंतर्गत मिठागर - सावली अशी नळपाणी पुरवठा योजना अमलात आणली, पण ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी २०१२ मध्ये आधीची योजना मिळून मिठागर ग्रामीण पेयजल योजना अमलात आणली होती. पहिल्या योजनेसाठी सुमारे ७५ लाख रुपये मंजूर करुन दिले. दुसऱ्या योजनेच्या वेळी सुमारे ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. एकूण सव्वा कोटी रुपये खर्च केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सध्या मात्र तीनतेरा वाजलेले आहेत.सावली - मिठागर - खामदे या गावच्या सरपंच मंदा ठाकूर यांनी ग्रामस्थांना होणाऱ्या पाण्याची व्यथा वेळोवेळी मांडली. वारंवार जिल्हा परिषदेकडे तक्रार करुनही जिल्हा परिषदेने याची दखल घेतली नाही. यावेळी समस्येची दखल घेत काही एनजीओजच्या महिलांनी गावच्या सरपंच मंदा ठाकूर यांच्यासह पाण्याची पाइपलाइन व गावातील कोरडी पडलेली साठवण टाकी यांची पाहणी केली. गावकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थ किसन कांबळे, बाळोजी पाटील, धर्मा पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर सातांबेकर, धर्मा पाटील, शंकर कांबळे हे यावेळी उपस्थित होते.या योजनेसाठी पाइपलाइन खोदाई खर्च सुमारे ५.७५ लाख एवढा लावलेला असताना प्रत्यक्षात पाहणी करता कुठेही खोदाई करुन पाइपलाइन जमिनीखाली टाकली नसल्याचे समोर आले आहे. स्टँडपोस्ट सहा लावले आहेत. त्याचा खर्च सुमारे ५०,००० रुपये इतका आहे. पण प्रत्यक्षात कुठेही स्टँडपोस्ट लावलेले नाहीत. पाइपलाइन हलक्या प्रतीची वापरल्याने ठिकठिकाणी पाण्याची गळती होत आहे. या योजनेसाठी केमशी बंधारा बांधला आहे. तिथे पाहणी केली असता बंधाऱ्याला ८ लाख रुपये इतका खर्च दाखवलेला आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीअंती असे निदर्शनास आले की २ लाखही येथे खर्च झालेला नाही. या बंधाऱ्याला पाण्याच्या पाइप लाइनसाठी चेंबर बांधला आहे. नदीच्या पात्रातून जाणारी पाइपलाइन ही लोंबकळत असल्याने येथे मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होते, त्यासाठी स्टँडपोस्ट गरजेचे होते पण ते कुठेच दिसत नाही. ठेकेदाराचे कामाकडे होतेय दुर्लक्षच्सावली - मिठागर - खामदे या गावांना जिल्हा परिषदेने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च केले आणि ते पाण्यात गेले. ठेकेदाराला सर्व रक्कम अदा केली आहे, नाममात्र रक्कम शिल्लक आहे तरी ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. सरपंच मंदा ठाकूर यांनी जिल्हा परिषद प्रशासन व तालुका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब वारंवार आणून दिली तरी याची दखल प्रशासन घेत नसल्याने तिन्ही गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे
नळ पाणी योजनेचे तीनतेरा
By admin | Published: February 02, 2015 10:50 PM