मुंबई : पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे पडसाद देशभर उमटत असताना जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर शौचालय उपलब्ध होत नसल्याने याचा मनस्ताप प्रवाशांना होत आहे.जोगेश्वरी फलाट क्रमांक १ व २वर प्रवाशांची गैरसोय होत आहे. पहिल्यांदा फलाट क्रमांक १च्या बाजूला शौचालय बांधण्यात आले होते. कालांतराने हार्बर रेल्वेमार्गाचे काम चालू केल्याने शौचालय तोडण्यात आले. तेव्हापासून प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली. फलाट क्रमांक ३ व ४वरील फलाटावर शौचालयाची व्यवस्था आहे. या फलाटावर जलद गाड्या क्वचितच थांबतात. त्यामुळे प्रवासी या दोन्ही फलाटांचा वापर कमी करतात. तसेच ३ व ४ फलाटांवरील शौचालयांमध्ये कर्मचारी, दरवाजे, पाणी आणि विजेची सोय नाही. काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून शौचालयाकडे जातात. रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असूनदेखील प्रवासी तसे करतात.दरम्यान, परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते मनीष पटेल यांनी सरकारकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटलेली नाही. (प्रतिनिधी)
जोगेश्वरी रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
By admin | Published: April 25, 2017 1:51 AM