Join us

नागरी सुविधांचे तीन तेरा

By admin | Published: February 01, 2015 11:27 PM

महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ४२ हा पूर्वेस असून चाळीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षात या प्रभागात अनधिकृत बांधकामेही मोठया प्रमाणावर वाढली

दीपक मोहिते, वसई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ४२ हा पूर्वेस असून चाळीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षात या प्रभागात अनधिकृत बांधकामेही मोठया प्रमाणावर वाढली आहेत. प्रभागामध्ये अनेक नागरी समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाई व साफसफाईच्या समस्या भेडसावत आहे. इमारतीचे बांधकाम करताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने त्या दाटीवाटीने उभारल्या गेल्यात. एखाद्या अपघात किंवा आग लागल्यास अग्निशमन दलाची वाहनेही आत जाऊ शकणार नाही अशा प्रकारची बांधकामे पहावयास मिळतात. या प्रभागातून निवडून येणारे बन्सीनारायण मिश्रा हे १ वर्ष प्रभाग समिती सभापती होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात विशेष विकासकामे होऊ शकली नाहीत. उन्हाळ्यात या प्रभागातील रहिवासी पाणीटंचाईमध्ये होरपळतात. अनेक नागरी संकुलाना पाण्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांची पदरमोड करावी लागते. प्रभागाला मार्च ते जून दरम्यान तीन दिवसआड पाणी मिळत असल्यामुळे टँकरचाच गृहसंकुलांना आधार वाटत असतो.दर पावसाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्याऐवजी शहारात साचणा-या पाण्याला नागरिकांना सामोरे जावे लागते. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग अनधिकृत बांधकामांमुळे नष्ट झाल्यामुळे शहराचा पूर्व भाग २ ते ३ दिवस पाण्याखाली जातो. त्यामुळे जनजीवनही पार विस्कळीत होते. प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात ती पाहावयास मिळत नाहीत. साफसफाईची कामे करणारा ठेकेदार कामावर पुरेसे कर्मचारी ठेवत नाहीत. त्यामुळे दैनंदिन कचरा उचलण्याचे काम शीघ्रगतीने होत नाही. गटारे साफसफाई होत नसल्यामुळे दर पावसाळ्यात शहराचा पूर्व भाग पाण्याखाली जात असतो. पावसाळ्यात रोगराईचा फैलावही मोठ्या प्रमाणात होतो. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लॅप्टोस्पायरोसीसचे दरवर्षी शेकडो रुग्ण या परिसरात आढळतात. रस्ते दुरूस्त्या या महत्वाच्या कामाकडेही अक्षम्य दुर्लक्ष होत असते. प्रभागांतर्गत असलेल्या रस्त्याची डागडुजी करणेही आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात प्रभागातील लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणावर ताण पडला. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात नगरसेवक मिश्रा उदासीन राहिल्यामुळे अनधिकृत बांधकामे सातत्याने वाढत आहेत. अनेक प्रभागांमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात अनेक मोहीम पार पडल्या. परंतु या प्रभागात तसे झाले नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडणार का असा सवाल उभा ठाकला आहे.