नेरळ/अंबरनाथ : सहलीसाठी गेलेल्या विक्रोळीतील दोघांचा तर कल्याणमधील एकाचा बुडून मृत्यू झाला. विक्रोळीतील दोघे कुटुंबीयांसोबत तर कल्याणमधील तरुण मित्रांसोबत रविवारी सहलीला गेलेले असताना ही दुर्घटना घडली.विक्रोळीतील दोघे कर्जत तालुक्यातील पाली-भुतीवली धरणात बुडाले. सोफाअली मुस्ताकअली नाईक (२२) आणि आमनअली अशिकअली शेख (१७) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. रविवारी हे दोघे कुटुंबीयांसोबत येथे सहलीसाठी गेले होते. दुपारी ३च्या सुमारास हे दोघे या धरणात पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.चिखलोली धरणावर पर्यटकांना बंदीअंबरनाथ येथील चिखलोली धरणाच्या ठिकाणी नितीन घाग हा तरुण बुडाला. कल्याण येथे राहणारे चार ते पाच जण चिखलोली धरणावर सहलीसाठी गेले होते. त्यातील नितीन घाग याने पोहण्यासाठी धरणात उडी घेतली.पाण्याचा अंदाज न आल्याने नितीन धरणाच्या पात्रातबुडाला. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला जात होता. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी चिखलोली धरणावर पर्यटकांना बंदी घातली आहे.कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली येथे लघु पाटबंधारे विभागाचे हे धरण आहे. याचा गेल्या काही वर्षांपासून वापर होत नाही. येथे पोहण्यासाठी बंदी असतानाही तरुण त्याकडे दुर्लक्ष करून धरणात उतरत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचे स्थानिक सांगतात.
सहलीसाठी गेलेले तिघे बुडाले;विक्रोळीतील दोघांचा तर कल्याणमधील एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 2:07 AM