Join us  

चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 1:00 AM

महापालिकेचा कानाडोळा; समस्या सोडवण्याची मागणी

ओमकार गावंड मुंबई : चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात ठीकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. येथे अनेक ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. लाल डोंगर येथील पंचशीलनगर व मुकुंदराव आंबेडकरनगर येथील नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. या परिसरातील शौचालयाच्या टाकीतील मलयुक्त पाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहे. गेले अनेक दिवस हा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे, परंतु महानगरपालिकेला वारंवार तक्रार करूनदेखील याची कोणतीच दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी या विभागात असणारे महापालिकेचे शौचालय एका खासगी विकासकाने त्याच्या प्रकल्पाच्या आड येत असल्याने तोडले. महानगरपालिकेने येथे शौचालय बांधून दिले नाही. विकासकाने येथील नागरिकांसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेले शौचालय बांधून दिले. या शौचालयाची टाकी अत्यंत छोटी असल्याने, ही टाकी ओव्हर फ्लो होऊन मलयुक्तपाणी रहदारीच्या रस्त्यावर २४ तास वाहत आहे. शौचालय महानगरपालिकेचे नसल्याने पालिका त्यांची साफसफाई व देखभाल करत नाही. यामुळेशेकडो कुटुंबाची गैरसोयलाल डोंगर परिसरातील डोंगरावरील शेकडो कुटुंबांची गैरसोय होत आहे. परिसर स्वच्छ राखणे हे महानगरपालिकेचे काम आहे, परंतु लाल डोंगर परिसरातील डोंगरावरील विभागात रहदारीच्या रस्त्यावरच शौचालयाचे टाकीतील मलयुक्त पाणी वाहत असल्याने, येथे रोगराई पसरण्याची भीती आहे.परिसरातील समस्या पालिकेने लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.