मुंबई : गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ ही प्रामुख्याने इमारतींमध्ये दिसून येत आहे. गेल्या ३४ दिवसांमध्ये मुंबईतील प्रतिबंधित इमारतींचा आकडा ८६ टक्क्यांनी वाढला आहे. १ सप्टेंबरपासून आतापर्यंत तब्बल तीन हजार ७७२ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण प्रतिबंधित इमारतींचा आकडा आता १० हजारांवर पोहोचला आहे.
आॅगस्ट महिन्यात नियंत्रणात असलेली रुग्णांची संख्या १ सप्टेंबरपासून झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे महापालिकेने काही नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. १ सप्टेंबर रोजी ६,२९३ इमारती सील होत्या. १४ सप्टेंबरपर्यंत एकूण ८,६३७ इमारती सील झाल्या तर आता ही संख्या १०,०६५ वर पोहोचली आहे. मात्र, एकीकडे सील इमारतींची संख्या वाढत असताना बाधित क्षेत्रांचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या मुंबईत ६१७ बाधित क्षेत्रे आहेत.जून महिन्यानंतर चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. तर इमारतींमध्ये रुग्णसंख्या वाढायला लागली. विशेष म्हणजे, सुरुवातीला तीन बाधित रुग्ण सापडले तरी संपूर्ण इमारत सील करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवड्यापासून महापालिकेने नियमात बदल करीत १०पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यासच इमारत सील करण्याचा निर्णय घेतला. तरीही गेल्या काही दिवसांमध्ये सील इमारतींची संख्या वेगाने वाढत चालली आहे.मुंबईतील सील इमारतींमध्ये ४२ हजार ७७२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बाधित ६१७ क्षेत्रांमध्ये ३२ हजार ८२२ रुग्ण आढळून आले आहेत.सील इमारतीसाठी नियमसील केलेल्या इमारतीत किंवा इमारतीच्या भागात बाहेरील व्यक्तीला, फेरीवाल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी, क्वारंटाइन असणाऱ्यांच्या अत्यावश्यक गरजा, किराणा माल, दैनंदिन साहित्य यासाठी सोसायटीने समन्वयाने नियोजन करावे. कोणतीही लक्षणे असल्यास पालिकेशी संपर्क साधावा. नियम कठोरपणे पाळण्यासाठी सुरक्षारक्षकाने नजर ठेवावी.