- मनीषा म्हात्रे, मुंबई
अत्यल्प मजुरी देत मुलांना राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. गेल्या साडेसहा वर्षात तब्बल तीन हजार बालमजुरांची सुटका करण्यास समाजसेवा शाखेला यश आले आहे तर बाल मजुरांना राबविणाऱ्या तब्बल दीड हजार मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जागतिक बाल मजुर दिनानिमित्त मुंबईतून बाल मजुरी हद्दपार करण्याचा विडा मुंबई पोलिसांनी उचलला आहे.बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाऱ्या बालमजुरांची संख्या अधिक असून महिन्याकाठी अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ते मुंबईत काम करतात. कमी वेतनात त्यांच्याकडून १२ - १२ तास मजुरी करुन घेतली जाते. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले तब्बल चार हजार बालमजुर मुंबईच्या विविध भागांमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. आले होते. २०१० पासून ते ५ जून २०१६ पर्यंत समाजसेवा शाखेने तब्बल ३ हजार ११७ बालमजुरांची सुटका केली आहे. तर १ हजार ५०६ जणांवर कारवाई केली. घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरी, चामडयाचा व्यवसाय, प्लास्टीक मोल्डींगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम काढून घेतले जाते म्हणून अशा उद्योगांमध्ये प्रौढांपेक्षा बालमजुरांसाठी मालक आग्रही असतात, असा निष्कर्ष समोर आला. तसेच पोलीस धाड घालून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात अधिक बाजमजूर काम करतात याची नोंद समाजसेवा शाखेने घेतली आहे. त्या त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखा करडी नजर ठेऊन आहे. मालकांनो सावधान...मार्च २०१५ मध्ये या कायद्यामध्ये शासनाकडून सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून यात त्यांना किमान सात वषार्ची शिक्षा होऊ शकते. त्यात जामीनावर सुटण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी मालकांना किमान दोन ते तीन महिने पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. - जागतिक बाल मजुर विरोधी दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी राबविलेल्या अभियानात गेल्या सहा दिवसात १४९ बाल मजुरांची सुटका करण्यात आली. तर याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करुन ९४ जणांना अटक करण्यात आली आहे. - उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठया प्रमाणावर बालमजुर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात. - मुख्यत्वे परराज्यांमधून येणारी ही लहान मुले छोटया टपऱ्या, हॉटेल, रस्त्यावरली गॅरेज, खाद्यपदार्थांच्या गाडयांवर काम करतात. तसेच गोवंडी, शिवाजीनगर येथील जरी उद्योग, भांडुप सोनापूरसारख्या लघुऔद्योगिक संकुलातील प्लास्टीक मोल्डींग, हमाली, चेंबुर-धारावीतला चर्मोद्योग येथे मोठया संख्येने बालमजुर आढळतात. - आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना हजार रूपयांपासून सहा ते सात हजार पगार दिला जातो.- मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहाण्याची व्यवस्था करतो. मात्र राहाण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते. कायद्यातील बदलामुळे बालमजुरी करुन घेणाऱ्या मालकांना नक्कीच चाप बसेल. त्यात यावर रोख आणण्यासाठी जनजागृतीबरोबर विविध उपक्रम राबवित आहोत. - प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त अंमलबजावणी