मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे ३ हजार २३ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीच्या विधानभवनात झालेल्या बैठकीत हा महोत्सव जागतिक दर्जाचा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री हे या समितीचे अध्यक्ष आहेत. श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास १८ आॅक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त १ आॅक्टोबर २०१७ ते १८ आॅक्टोबर २०१८ दरम्यान हा महोत्सव होणार आहे. या समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली. अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पूर्व तयारीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक विशेष सेल तयार करण्यात यावा. प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. महोत्सव काळात व इतर महत्त्वाच्या दिवशी गर्दीच्या वेळी स्वच्छता राहील, याची काळजी घेण्यात यावी. याशिवाय बाह्यवळण रस्त्याची कामेही तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (विशेष प्रतिनिधी) पहिल्या टप्प्यात ७८९ कोटींची कामेपहिल्या टप्प्यात ७८९ कोटींची तर दुसऱ्या टप्प्यात २ हजार २३३ कोटींची कामे करण्यात येणार आहेत.दर्शन रांग उभारणे - १५७ कोटी, साईसृष्टी, प्लॅनेटेरियम व वॅक्स म्युझियमची उभारणी - १४१ कोटी, मल्टिमीडिया थीमपार्क अंतर्गत लेझर शो उभारणे - ७२ कोटी, वाढीव पाणीपुरवठा ५८.१४ कोटी, सीसीटीव्ही २० कोटी आदी खर्चाचा आराखड्यात समावेश आहे.
तीन हजार कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By admin | Published: April 01, 2017 3:16 AM