मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तीन हजार रुग्ण प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:22 AM2022-07-30T05:22:28+5:302022-07-30T05:23:05+5:30

मुंबईत अवयव प्रत्यारोपणासाठी लांबलचक प्रतीक्षा यादी

Three thousand patients are waiting for kidney transplant | मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तीन हजार रुग्ण प्रतीक्षेत

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तीन हजार रुग्ण प्रतीक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कोरोना संसर्गानंतर अवयवदान मोहिमेला खीळ लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा काहीशी गती धरल्यानंतर आता अवयवदान मोहीम कासवगतीने सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत वीस अवयवदात्यांनी ६९ अवयव दान केले आहेत. मात्र, तरीही शहर उपनगरातील अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी लांबलचक आहे. एकूण तीन हजार ७१४ रुग्ण प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी एकूण तीन हजार ३१९ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. 

कोरोनानंतरही शासकीय रुग्णालयातील अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने या रुग्णालयांना तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव दानाबाबत जनजागृती वाढली आहे. अनेक दाते पुढे येत आहेत. हे प्रमाण वाढत असले तरी अजूनही मोठ्या संख्येने दाते पुढे येण्याची गरज आहे. 

मुंबई- हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, डोळे, स्वादुपिंड, आतडे अशा अनेक प्रकारच्या आतड्यांचे प्रत्यारोपण केले जाते. अनेक रुग्ण दात्यांच्या प्रतीक्षेत असतात. त्यानुसार दर महिन्याला मुंबईत बऱ्यापैकी अवयव प्रत्यारोपण केले जाते.  अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केवळ आणि केवळ तत्काळ अवयव प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता आहे. जुलै महिन्यातील १९ तारखेला अवयवदान पार पडले. शहर, उपनगरात आतापर्यंत २१ जणांनी मरणोत्तर अवयवदान केले आहे.  यामध्ये सर्वाधिक २४ मूत्रपिंडांचा समावेश आहे. त्याखालोखाल यकृत (१८), हृदय (१७), फुफ्फुस (३), हात (४), स्वादुपिंड (१) आणि लहान आतडे (१) या अवयवांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.

दरवर्षी देशात शेकडो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची  संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. दरवर्षी २.१ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते. मात्र,  प्रत्यक्षात केवळ तीन ते चार मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही  वेगळी नाही.  देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १०० लोकांचे  हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. नॅशनल प्रोगाम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाईडनेस (एनपीसीबी)च्या २०१२-१३ च्या अहवालानुसार २०१२-१३ मध्ये देशात ८० हजार ते एक लाख कॉर्नियाची गरज असताना केवळ ४४१७ कॉर्निया उपलब्ध होते. देशभरात सध्या १२० प्रत्यारोपण केंद्रे असून तिथे दरवर्षी साडेतीन ते चार हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया  केल्या जातात.  यापैकी चार केंद्रांवर १५० ते २०० यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात, तर काही केंद्रांवर क्वचित एखादे हृदय प्रत्यारोपण केले जाते.

 अवयव प्रतीक्षायादीतील रुग्णसंख्या 
 मूत्रपिंड              ३ हजार ३१९ 
 यकृत                ३३१ 
 हृदय                ४७ 
 स्वादुपिंड           १३ 
 हात                  ०३ 
 छोटी आतडे        ०१ 

मुंबईत यंदाच्या वर्षातील २१ वे अवयवदान पार पडले. गिरगाव येथील एच.एन. रिलायन्स फाउंडेशन या खासगी रुग्णालयातील ५८ वर्षीय रुग्णाने अवयवदान केले. 

Web Title: Three thousand patients are waiting for kidney transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.