मुंबई : मलबार हिल येथील राजभवनमध्ये वर्षभरापूर्वी उत्खननामध्ये तळघरातील १३ खोल्या आढळल्या होत्या. आता या खोल्यांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास साकारण्यात येणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी हे खुले करण्यात येणार आहे. शिवाय तळघरासह राजभवनाचा परिसर, बदक तलाव, दरबार हॉल, हर्बल गार्डन हेदेखील पर्यटकांना पाहता येणार आहे.महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राजभवनात खास पर्यावरणस्नेही बॅटरीवर चालणारे वाहन पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये तळघरातील खोल्यांमधील हे काम पूर्ण होईल आणि ही सेवा पर्यटकांसाठी खुली केली जाईल. आठवड्यातून तीन दिवस राजभवन पर्यटकांसाठी खुले असेल. पर्यटक याची नोंदणी आॅनलाइन करू शकतील.राजभवन कॉम्प्लेक्समध्ये अनेक दशके बंद असलेले १५० मीटर लांबीचे बंकर शोधले गेले होते. तळघरात वेगवेगळ्या आकाराच्या १३ खोल्या आढळल्या. हे तळघर दुसºया महायुद्धावेळी बांधले असावे, असा अंदाज इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या तळघरातील १३ खोल्या आणि राजभवनाचा परिसर पर्यटनासाठी खुला करावा, अशी सूचना राज्यपाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केली होती. यानुसार महामंडळाने योजना आखून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. याचाच पहिला टप्पा म्हणून महामंडळाने राजभवनाकडे एक पर्यावरणस्नेही बॅटरीवर चालणारे वाहन सुपुर्द केले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तळघरातील १३ खोल्यांमध्ये शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देणारी चित्रे, शिल्पे साकारली जातील. राज्याचा इतिहास व परंपरा सांगणारे दृकश्राव्य कार्यक्रम आणि काही पथनाट्येही येथे होणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
आठवड्यातून तीनदा राजभवन पर्यटकांसाठी खुले, नोंदणी करता येणार आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 2:30 AM