लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : होळीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या समन्वयाने या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेनेही होळीबरोबरच विशेष उन्हाळी गाड्याही सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल ते मडगाव (गाडी क्रमांक ०१४५९) ही विशेष गाडी २६ फेब्रुवारी, ५ आणि १२ मार्च असे तीन दिवस धावणार आहे. ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक स्थानकातून रात्री १०:१५ मिनिटांनी सुटेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचेल. मडगाव जंक्शनहून २७ फेब्रुवारी, ६ आणि १३ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक टर्मिनलसाठी रवाना होईल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल.
गाडी क्रमांक ०१४४५ ही पुणे जंक्शन ते करमाळी विशेष साप्ताहिक गाडी २४ फेब्रुवारी, ३, १० मार्च १७ मार्च राेजी पुणे जंक्शनहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता करमाळी स्थानकावर पोहचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.