Join us

मेट्रोसाठी मिठी नदीजवळ असणार तीन बोगदे; भुयारीकरणाचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 1:36 AM

कोलकात्यातील हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा चेन्नई येथील भुयारी मेट्रोसाठी करण्यात आला असून, मिठी नदी पात्राखालचा हा तिसरा बोगदा असणार आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ साठी मिठी नदीजवळ एकूण तीन बोगदे असणार आहेत़ दोन बोगद्यांचा वापर मेट्रो ये-जा करण्यासाठी होणार आहे़ तर काही गाड्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी)पर्यंत येऊन परत जाणार आहेत़ त्यासाठी या तिसऱ्या बोगद्याचा वापर होणार आहे़ बीकेसी येथे मेट्रोचे टर्मिनल असणार आहे़ एखादी गाडी बंद पडल्यास तिसºया बोगद्यातून ती टर्मिनलमध्ये आणली जाईल.

मिठी नदीखालील भुयारीकरण हे प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक काम आहे़ मिठी नदीच्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या भागातून टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) उतरवण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पाचा धारावी ते बीकेसी हा १.८ किमीचा पट्टा नदीखालून जाणार आहे. आत्तापर्यंत या भुयारीकरणाचे पाच मीटरचे काम झाले आहे.

कोलकात्यातील हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा चेन्नई येथील भुयारी मेट्रोसाठी करण्यात आला असून, मिठी नदी पात्राखालचा हा तिसरा बोगदा असणार आहे. सध्या या मार्गिकेच्या गोदावरी-१ यंत्राद्वारे देशांतर्गत विमानतळ स्थानकासाठी २.९ किलोमीटरचे भुयारीकरण वेगाने सुरू आहे. हे काम ४५५ दिवसांमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. मिठी नदीखालून जाणारा बोगदा हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाणारे काम मेट्रो-३ प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात होणार आहे. धारावी आणि आग्रीपाडा परिसरामध्ये बोगद्याच्या एकूण ७ हजार ९९२ मीटर कामापैकी ४ हजार ७४४ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. वरळी आणि धारावी स्थानकाच्या परिसरातील ६ हजार २६७ मीटरचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी २३ हजार १३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) हा टप्पा २०२१ सालापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, तर बीकेसी ते कफ परेड या टप्प्याचे काम या टप्प्याच्या नंतर करण्यात येणार आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरण्याच्या कामामध्ये दरदिवशी सुमारे ३१ मेट्रीक टन मातीचे उत्खनन करण्यात येत आहे.

स्पेशल वॉटरप्रूफ गॅस्केटचा वापरसंपूर्ण मिठी नदीच्या क्षेत्रात खालोखाल टीबीएमच्या कामासाठी स्पेशल वॉटरप्रूफ गॅस्केटचा वापर करण्यात येत आहे. भूगर्भात काम करताना टनेलमधील अतिशय संवेदनशील भागासाठी हे गॅस्केट उपयुक्त ठरणार आहेत. एथिलिन प्रॉपिलीन डाइन मोनोमर (ईपीडीएम) या स्पेशल गॅस्केटचा वापर मिठी नदीच्या कामाअंतर्गत करण्यात येत आहे. हे गॅस्केट साऊथ कोरियात तयार करण्यात आले आहे. तर स्पेशलाईज्ड गॅस्केट हे इंग्लंड येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. मिठी नदीच्या पाण्याचा वापर या गॅस्केट तपासणीच्या कामादरम्यान करण्यात आला होता. हायड्रोफिलिक गॅस्केट तसेच पॉलिमेरिक गॅस्केटचा वापर हा अतिरिक्त सुरक्षिततेसाठी करण्यात येणार आहे.

विधान भवन मेट्रो स्थानकामध्ये बेस स्लॅब पूर्णएमएमआरसी अंतर्गत पॅकेज १ मधील विधान भवन मेट्रो स्थानकामध्ये बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती. बुधवारी हे काम पूर्ण झाले. आता बाजूच्या भिंती, स्तंभ आणि एकत्रित स्लॅब बांधणे ही कामे प्रगतिपथावर असल्याचे एमएमआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रो