मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे बोरीवली आणि दहिसरमध्ये तीनतेरा वाजले आहेत. या ठिकाणी साचणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडे कचरा वाहतूक गाडीच नाही. परिणामी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याचे पडसाद आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीच्या बैठकीत उमटू लागले आहेत.प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत, लोकप्रतिनिधींकडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. म्हात्रे यांनी सांगितले की, दोन्ही प्रभागांतील १८ नगरसेवकांसह पालिका उपायुक्त अशोक खैरे यांच्यासह आर उत्तरच्या साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर आणि आर मध्य साहाय्यक पालिका आयुक्तही बैठकीत उपस्थित होते. ‘कचरा उचलण्यास गाडी नाही’, ‘मानखुर्दला कचरा टाकायला गेलेली गाडी वेळेवर परत येत नाही’, ‘गाड्यांना डिझेल नाही’, ‘गाडीला चालक नाही’ अशा कारणांस्तव विभागात कचरा साचल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार आणि खासदारांच्या तुलनेत नगरसेवकांना सापत्न वागणूक मिळत मिळते. आमदार व खासदारांकडून नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आमदार-खासदारांच्या विभागातील कामांच्या पाहणी दौऱ्यात जातीने हजर राहणारे पालिका अधिकारी नगरसेवकांची नागरी कामे करत नसल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली.
‘स्वच्छ भारत’चे तीनतेरा
By admin | Published: June 25, 2017 3:39 AM