स्टील चेंबर्समध्ये वितरणचे तीनतेरा
By Admin | Published: July 3, 2014 11:06 PM2014-07-03T23:06:10+5:302014-07-03T23:06:10+5:30
कळंबोली स्टील चेंबरच्या अंतर्गत वीज वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. जुनाट झालेल्या वायरिंगबरोबरच मीटर बॉक्स गंजले आहेतच, त्याचबरोबर अंतर्गत डीपी पाण्यात जात आहे.
कळंबोली : कळंबोली स्टील चेंबरच्या अंतर्गत वीज वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. जुनाट झालेल्या वायरिंगबरोबरच मीटर बॉक्स गंजले आहेतच, त्याचबरोबर अंतर्गत डीपी पाण्यात जात आहे. या संदर्भात गेल्या वर्षी महावितरणला स्टील चेंबर सोसायटीकडून कळविण्यात आले होते. मात्र त्याला केराची टोपली दाखवून कोणतेही खबरदारी घेण्यात आलेली नाही. परिणामी या सोसायटीचे सभासद दीपक निकम यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला दुबार पत्र लिहून या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात सोसायटीला सूचना देण्याची विनंती केली आहे.
कळंबोली लोह - पोलाद मार्केट परिसरात स्टील चेंबर टॉवर असून ही इमारत २० वर्षे जुनी आहे. या ठिकाणी सुमारे ७०० गाळ्यांची संख्या असून तेथे बिझनेस कार्यालय सुरु आहेत. या इमारतीची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी स्टील चेंबर कळंबोली बिझनेस आॅफिस प्रिमायसेस को. आॅप. सो.लि. या सहकारी संस्थेवर आहे. ही सोसायटी प्रत्येक सभासदाकडून महिन्याला १ रुपया ५० पैसे प्रति चौरस फूट जनरल चार्जेस घेत आहे. या ठिकाणी सुरक्षितेतची काळजी घेणे ही संबंधित सोसायटीची जबाबदारी आहे. मात्र या ठिकाणच्या अंतर्गत वीज वितरण व्यवस्थेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. येथील मीटर केबिन बॉक्समधील वायरिंगची स्थिती अतिशय खराब झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पावसाळ्यात पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आले होते.
या संदर्भात महावितरणच्या कळंबोली उपविभागीय कार्यालयातून गेल्या वर्षी पाहणीही करण्यात आली होती. इतकेच काय १२ आॅगस्ट २०१३ रोजी सोसायटीला नोटीस देऊन नूतनीकरण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर सोसायटीने जर या संदर्भात दखल घेतली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला होता. मात्र ना नूतनीकरण झाले ना सोसायटीवर कारवाई झाली. त्या नोटिसीला सोसायटीने केराची टोपली दाखवली आहे. या ठिकाणी गाळेधारक दीपक निकम यांनी कळंबोली उपविभागीय कार्यालयात नुकतेच पत्र दिले आहे. इतकेच नाही तर उपकार्यकारी अभियंता रामटेके यांची भेट घेऊन स्टील चेंबर इमारतीतील प्रत्यक्ष तपासणी करण्याचा आग्रह धरला. त्याचबरोबर अंतर्गत वीज वितरण व्यवस्थेची स्थिती कशी आहे याचे अवलोकन प्रत्यक्ष करुन सोसायटीला सूचना द्यावी अशी विनंती निकम यांनी केली. त्यानुसार वितरणच्या रामटेके यांनी आपण इलेक्ट्रीकल इंजिनिअरला पाठवून संबंधित वीजवितरण व्यवस्थेची तपासणी करु असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)