Join us  

वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारती जमीनदोस्त 

By जयंत होवाळ | Published: June 11, 2024 8:03 PM

अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने पाडल्या.    

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याचे निलंबन आणि एकाची बदली करण्याची कठोर कारवाई आयुक्तांनी केल्यानंतर वेसावेतील  तीन अनधिकृत इमारतींवर पालिकेने हातोडा चालवला. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने पाडल्या.       

वेसावे येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यादृष्टीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने    विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मागील आठवड्या वेसावे येथे दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती.   पहिल्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर एक मजला, दुसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले, तर तिसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले असे या अनधिकृत इमारतींचे बांधकाम आहे .

पालिकेचे१० अधिकारी, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. वेसावेसह अन्य कोणत्याही भागातील अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.   

टॅग्स :मुंबई