राज्यात स्वाइन फ्लूचे २१२ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:59 AM2019-09-17T05:59:43+5:302019-09-17T05:59:51+5:30
राज्यात पावसाच्या विश्रांतीनंतरही स्वाइन फ्लूसह साथीच्या आजारांचा जोर कायम आहे
मुंबई : राज्यात पावसाच्या विश्रांतीनंतरही स्वाइन फ्लूसह साथीच्या आजारांचा जोर कायम आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते १५ सप्टेंबर या काळात राज्यात स्वाइन फ्लूचे २१२ बळी गेले असून २ हजार २०७ रुग्णांची संख्या आहे. तर एकूण ९० रुग्ण राज्याच्या विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूवर उपचार घेत आहेत. राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
१ जानेवारी ते १५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात २१ लाख १८ हजार २७० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात आॅसेलटॅमिवीर दिलेल्या संशयित रुग्णांची संख्या ३४ हजार ६११ एवढी आहे. तर स्वाइन फ्लूचे उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेले रुग्ण १ हजार ९०६ एवढे आहेत. नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये २७, अहमदनगर येथे २०, पुणे मनपाच्या हद्दीत १७ आणि कोल्हापूरमध्ये ११ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लुएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या व तिसºया तिमाहीतील गर्भवतींसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. १ जानेवारी ते १५ सप्टेंबर या काळात ५१ हजार ९८९ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.
>आरोग्य विभागाकडून केल्या जाणारे उपाय
फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार
राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्ष
उपचार सुविधा असणाºया सर्व खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लू
उपचारांची मान्यता
खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची स्थापना