दक्षिण मुंबईत वाहतुकीचे तीनतेरा
By admin | Published: June 14, 2017 02:44 AM2017-06-14T02:44:00+5:302017-06-14T02:44:00+5:30
रमजानचा महिना सुरू असून दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली मार्गावरील मदीन मशिदीजवळ वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत चाखण्यासाठी मुस्लीम बांधवांसोबत
मुंबई : रमजानचा महिना सुरू असून दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली मार्गावरील मदीन मशिदीजवळ वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत चाखण्यासाठी मुस्लीम बांधवांसोबत विविध धर्मांचे हजारो खवय्ये गर्दी करत आहेत. खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्या खवय्यांमुळे येथील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. मंगळवारी तर मोहम्मद अली मार्गावरील वाहतूककोंडी नागपाडा मार्गे भायखळ्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईनजीकच्या परिसरातून मोठ्या संख्येने खवय्ये मोहम्मद अली मार्गावर येत आहेत. खाण्याच्या पदार्थांसह विविध वस्तूंचे खरेदी करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीत वाहतूककोंडीची शक्यता असतानाही, वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून पुरेशी खबरदारी घेतल्याचे दिसत नाही. पायधुनी आणि नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या मार्गावर सर्रासपणे डबल पार्किंग केली जात आहे. पदपाथाचा ताबा घेतलेले फेरीवाले तर चक्क रस्त्यावर उतरून पदार्थांची विक्री करत आहेत. काही दुकानदारांनी तर थेट रस्त्यालगतच दुकाने थाटली आहे. काहीच महिन्यांपूर्वी या ठिकाणच्या अनधिकृत दुकानांवर महापालिकेने कारवाई केली होती. मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत फेरीवाल्यांनी पुन्हा अनधिकृत दुकाने उभारली आहेत.
नेहमीच वाहतूककोंडी होणाऱ्या मोहम्मद अली मार्गावर रमजान काळात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डबल पार्किंगवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याशिवाय केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आवाहन वाहनचालकांकडून केले जात आहे.
मुंबईकरांनो,
वेळेआधी निघा!
मुंबईत ठिकाठिकाणी विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तरी मुंबईकरांनी विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळेआधी निघण्याची तसदी घ्यावी, असे आवाहन मुंबई वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी केले आहे.
भायखळा ते सीएसएमटीपर्यंत मोहम्मद अली मार्गावरून दुचाकीने निमयित प्रवास करताना २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हेच अंतर कापण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे खर्ची घालावी लागत आहेत. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस उभे दिसतात. विनाहेल्मेट दुचाकींवर कारवाई सुरूच दिसते. मात्र वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी घेताना क्वचितच पोलीस दिसतात.
- आशिष चव्हाण, दुचाकीस्वार
पायधुनी आणि नागपाडा परिसरात वाहतूककोंडी झाल्याने भायखळ्यातील वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत होती. स्वत: जंक्शनवर उभा असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. रमजानमुळेच नव्हे, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर नियमित नो पार्किंगची कारवाई सुरू असते. त्यामुळेच मोहम्मद अली मार्गावर कोंडी असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक सुरळीत दिसते.
- सिद्धार्थ शिंदे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भायखळा वाहतूूक विभाग