अवघ्या सहा तासांत तीन महिलांना लुटले!

By admin | Published: June 18, 2014 02:42 AM2014-06-18T02:42:15+5:302014-06-18T02:42:15+5:30

गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर आणि माहीम भागात रविवारी तीन महिलांच्या गळ्यातील तब्बल २ लाख २२ हजारांचे दागिने हिसकावून लुटारूंनी पळ काढला.

Three women were robbed in just six hours! | अवघ्या सहा तासांत तीन महिलांना लुटले!

अवघ्या सहा तासांत तीन महिलांना लुटले!

Next

मुंबई : गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर आणि माहीम भागात रविवारी तीन महिलांच्या गळ्यातील तब्बल २ लाख २२ हजारांचे दागिने हिसकावून लुटारूंनी पळ काढला. याबाबत माहीम आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून, पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढणाऱ्या सोनसाखळीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. मात्र तरीही रोज तीन ते चार महिलांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे रविवारी दादर आणि माहीम परिसरात लुटारूंनी तीन महिलांना लुटले. या आरोपींनी महिलांच्या गळ्यातील १०६ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या घेऊन पळ काढला. माहीमच्या कटारिया मार्ग येथे राहणारी विजया सणस ही तरुणी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानात सामान खरेदीसाठी उभी असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन लुटारूंनी तिच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याच परिसरात दुसरी घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कामावरून घरी जात असलेल्या रश्मी वैद्य या महिलेच्या गळ्यातील १ लाख ६२ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. या दोन्ही महिलांनी याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तिसऱ्या घटनेत दादरच्या
अश्विनी गेस्ट हाऊस येथे राहणारी स्मिता बोरकर ही महिला पतीसोबत सायंकाळी ५ वाजण्याच्या
सुमारास दादर रेल्वे स्थानकाकडे जात असताना अनंत पाटील मार्गावर अचानक दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेच्या पतीने या लुटारूंचा पाठलाग केला. मात्र लुटारूंनी भरधाव वेगात गाडी चालवून पोबारा केला. घटनेनंतर महिलेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three women were robbed in just six hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.