मीरा रोडमध्ये टाकीत गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:38 AM2019-01-17T05:38:04+5:302019-01-17T05:38:24+5:30

मीरा रोडच्या क्लस्टर-६ जवळ जुनी म्हाडा वसाहत आहे.

Three workers die in a tank at Mira Road | मीरा रोडमध्ये टाकीत गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

मीरा रोडमध्ये टाकीत गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील एका मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या तीन कामगारांचा बुधवारी मृत्यू झाला. एक कामगार अत्यवस्थ असून, काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मीरा रोडच्या क्लस्टर-६ जवळ जुनी म्हाडा वसाहत आहे. म्हाडाच्या जागेत पालिकेने मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्र बांधलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून, एसपीएमएल ही ठेकेदार कंपनी याचे काम पाहते. बुधवारी या मलनि:सारण केंद्रातील सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी चार ते पाच कामगार आले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुमारे दोन मीटर खोल टाकीत आधी एक कामगार उतरला. त्याने आतमधील व्हॉल्व्ह साफ करण्यासाठी उघडला असता, साचलेला घातक वायू वेगात बाहेर आला. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी आणखी दोन कामगार टाकीत उतरले; मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. टाकीजवळ उभ्या असलेल्या अन्य एका मजुरासही विषारी वायूची बाधा होऊन तोही अत्यवस्थ झाला. याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत टाकीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मुझफ्फर मोहलिक (२४), रफिक मंडल (५०) व मफिजुल (१९) अशी मृत कामगारांची नावे असून, ते सर्व इंद्रलोक फेज-६ चे रहिवासी असल्याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाने दिली. हे कामगार नाक्यावरून आणले होते.


सांडपाणी प्रकल्पाची टाकी साफ करण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती. त्यांना मास्क आणि अन्य आवश्यक साहित्यसुद्धा दिले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी आधी उद्यानाचे आरक्षण होते. पण, पालिकेने येथे मलनि:सारण केंद्र सुरू केले. रहिवाशांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, लोकांना त्रास होणार नाही, असे पालिकेने आश्वस्त केले होते. परंतु, प्रकल्प सुरू करताच दुर्गंधी पसरल्याने तसेच केंद्राच्या आवारात मुले खेळत असल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी रहिवासी सतत करत होते.


विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक राजू भोईर यांनी, सदर प्रकरणास पालिका व ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे रहिवाशांसह आम्ही गेल्या काही महिन्यांपासून पालिकेला सतत कळवत असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.


या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, चौकशीनंतर दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले. यासंदर्भात शहर अभियंत्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

रहिवाशांचा घेराव
या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी या प्रकाराबद्दल महापालिकेला जबाबदार ठरवत, यासंदर्भात सतत तक्रारी करूनसुद्धा पालिकेने डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या महापौर डिम्पल मेहता व आयुक्त बालाजी खतगावकर यांनासुद्धा संतप्त रहिवाशांनी घेराव घातला.

Web Title: Three workers die in a tank at Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.