एमएचटी-सीईटीतील गणिताच्या उत्तरतालिकेतील तीन चुकीच्या प्रश्नांची दखल नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:16 PM2024-06-01T23:16:36+5:302024-06-01T23:16:53+5:30

एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारलेला

Three wrong questions in MHT-CET Mathematics answer sheet are ignored | एमएचटी-सीईटीतील गणिताच्या उत्तरतालिकेतील तीन चुकीच्या प्रश्नांची दखल नाही!

एमएचटी-सीईटीतील गणिताच्या उत्तरतालिकेतील तीन चुकीच्या प्रश्नांची दखल नाही!

रेश्मा शिवडेकर, मुंबई : एप्रिल-मे दरम्यान पार पडलेल्या एमएचटी-सीईटीच्या गणित विषयाच्या चार प्रश्नांच्या उत्तरतालिकेतील चुकीच्या उत्तरांची दखलच राज्याच्या सीईटी सेलकडून घेण्यात आली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

१० मे रोजी दुसऱया शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा आक्षेप आहे. महत्त्वाचे म्हणजे हाच प्रश्न गेल्यावर्षीही विचारण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप नोंदविला होता. मात्र तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नव्हती. या प्रकारामुळे एमएचटी-सीईटीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, अशी तक्रार माईंडसेटर्स प्रायव्हेट ट्युशन्सचे प्रा.सुनील भट यांनी उपस्थित केला.

२२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ३० सत्रात ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांबाबत १४२५ आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यापैकी ४७ आक्षेपांचे निराकरण करण्यात आले. यात गणितातील चार प्रश्नांचा समावेश नसल्याने अनेक चिंतातुर विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला भेट देत हा प्रकार लक्षात आणून दिला. मात्र, आता कोणतीही दुरूस्ती केली जाणार नाही, असे सेलकडून सांगण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रवेशाकरिता एकएक गुणासाठी विद्यार्थी झगडत असताना केवळ उत्तरतालिकेतील चुका किंवा त्रुटींमुळे त्यांचे विनाकारण नुकसान होणार आहे, अशी व्यथा एका पालकाने मांडली.
 

एक आक्षेप एक हजाराचा

विद्यार्थी-पालकांसाठी प्रश्नावर आक्षेप उपस्थित करणेही महागडे प्रकरण ठरते. प्रत्येक प्रश्नाकरिता पालकांना एक हजार रूपये मोजावे लागतात. परंतु, इतके पैसे मोजूनही विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचे योग्य निराकरण होत नसल्याचे दिसून येत आहे.
 

आक्षेप असलेले इतर तीन प्रश्न

३ मे रोजी दुसऱया शिफ्टमध्ये इक्वेशनबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर ९४४७३८ असताना ते चुकीचे ९४४७४० असे दाखविण्यात आले आहे.

१० मे रोजी दुसऱया शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे दिलेले सर्वच पर्याय चुकीचे असताना ९५०९७० हे चुकीचे उत्तर बरोबर म्हणून दाखविण्यात आले आहे.

११ मे रोजी दुसऱया शिफ्टमध्ये सॉल्युशन्सबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर ९५२२४५ असताना ते चुकीचे ९५२२६ दाखविण्यात आले आहे.

Web Title: Three wrong questions in MHT-CET Mathematics answer sheet are ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई