Join us

तीन वर्षाच्या मुलीवर केलेले अत्याचार, आठ वर्षांनी 'पोक्सो'च्या आरोपीला आजन्म कारावास

By गौरी टेंबकर | Published: December 29, 2023 6:51 PM

दिंडोशी सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जवळपास आठ वर्षांपूर्वीच्या एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या पोक्सोच्या प्रकरणातील आरोपी सुरज उर्फ सूर्या महत्तम मंडल (३४) याला दिंडोशी सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर शुक्रवारी हा फैसला सुनावण्यात आला.

अल्पवयीन मुलगी ही २०१६ मध्ये गोरेगाव पूर्वच्या वडारीपाडा झोपडपट्टी राहायची. त्याच परिसरात राहणाऱ्या मंडलच्या घरात ती अन्य लहान मुलांसोबत खेळायला जायची. याचा फायदा घेत मंडल या मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब त्याच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलीला त्याच अवस्थेत सोडून मंडल तिथून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र दिंडोशी पोलीस ठाण्याचे गोकुळधाम पोलीस चौकीत कर्तव्य बजावत असलेले अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना स्थानिकांनी याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सूर्यवंशी यांनी तातडीने आरोपीचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या.

तसेच याप्रकरणी कसून तपास करत आरोपी विरोधात सर्व सबळ पुरावे गोळा करत वेळेत आरोपपत्रही कोर्टात दाखल केले. त्यानुसार याप्रकरणी मंडलला आजन्म सश्रम कारावास, दोन हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सत्र न्यायालयाने २९ डिसेंबर, २०२३ रोजी सुनावली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात, निरीक्षक धनंजय कावडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मणचेकर, हवालदार तांबे, शिपाई झोडगे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले  तसेच समन्स व कार्यालयीन कामकाज हवालदार कर्पे, शिपाई माने, पाटिल, भोसले यांनी पाहिले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान दिंडोशी पोलिसांनी सत्र न्यायालय परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :मुंबई