तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार
By admin | Published: October 16, 2016 03:17 AM2016-10-16T03:17:50+5:302016-10-16T03:17:50+5:30
चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना अंधेरीतील गोणीनगर परिसरात घडली आहे.
मुंबई : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना अंधेरीतील गोणीनगर परिसरात घडली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारातील संशयित इसमाचा शोध घेण्यास एमआयडीसी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बालिकेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
अंधेरीच्या गोणीनगरमध्ये राहणाऱ्या एका फळविक्रेत्याची तीन वर्षांची मुलगी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. तेव्हा एक जण तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. बराच वेळ ती परत न आल्याने तिच्यासोबत खेळत असणाऱ्या मुलाने तिच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला. घरातल्या मंडळींनी तिचा शोध घेतला असता काही अंतरावर मोकळ्या जागेत ती रडत असल्याचे आढळून आले. वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या दाम्पत्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अनोळखी इसमाविरोधात बलात्कार व बालअत्याचार प्रतिबंधक (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपीचे वर्णन समजू शकलेले नाही. बालिकेसमवेत खेळणाऱ्या मुलाने सांगितलेल्या वर्णनानुसार संशयिताचे रेखाचित्र तयार करून शोध घेत आहोत, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी सांगितले.