Join us

तृतीय वर्षाच्या परीक्षांचे तीनतेरा

By admin | Published: October 07, 2015 2:34 AM

मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या तृतीय वर्षांच्या परीक्षा प्रक्रियेचे मंगळवारी तीनतेरा वाजले. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे

मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या तृतीय वर्षांच्या परीक्षा प्रक्रियेचे मंगळवारी तीनतेरा वाजले. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे बैठक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आणि बहुतेक परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांचे हाल झाले.सोमवारी काही परीक्षा केंद्रांवर हॉल तिकिटांचा गोंधळ उडाला होता. मंगळवारी मुंबईतील अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर डाऊनलोड होण्यास अडचणी येत असल्याने पेपर उशिराने सुरू केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकरणी एमकेसीएलची तक्रार विद्यापीठाकडे केल्याचे काही महाविद्यालयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत हॉल तिकीट न मिळाल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. मात्र त्याला महाविद्यालय जबाबदार असल्याचे परीक्षा नियंत्रण मंडळाने सांगितले होते. मंगळवारी सकाळपर्यंत हॉल तिकीट मिळेल, असा दावा काही महाविद्यालयांनी केला होता. मात्र मंगळवारी सकाळी परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. कारण काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात आली होती. एमकेसीएलने विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांवर दिलेले ठिकाण आणि परीक्षा केंद्र यांमध्ये तफावत असल्याने घडल्याचे स्पष्टीकरण परीक्षा नियंत्रकांनी दिले आहे. त्यामुळेच हा गोंधळ उडाल्याचेही त्यांनी कबूल केले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या या गोंधळाबाबत मनविसेचे सुधाकर तांबोळी आणि संतोष गांगुर्डे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करून एमकेसीएलला हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली.संकेतस्थळावरील परीक्षा केंद्रानुसार बैठक व्यवस्थामंगळवारी उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून परीक्षा विभागाने परिपत्रक काढत सुधारित वेळापत्रक आणि बैठक व्यवस्था जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे आवाहन परिपत्रकात करण्यात आले आहे.