लाचखोर कक्ष अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:56 AM2019-05-01T01:56:31+5:302019-05-01T01:57:05+5:30
मंत्रालयात होता कार्यरत : विशेष न्यायालयाचा निकाल
मुंबई : निलंबन मागे घेऊन पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या मंत्रालयातील लाचखोर कक्ष अधिकाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. उदयसिंग गोकूळसिंग चौहाण असे अटक कक्ष अधिकाऱ्याचे नाव आहे.
एसीबीने २०१३ साली त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. मंत्रालयातील शहर विकास विभागामध्ये चौहाण हा कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होता. २०१३ साली त्याने या प्रकरणातील तक्रारदार आणि सहकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईतून मुक्त करून, त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. पैशांची मागणी होताच तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचला. तडजोडीअंती ७५ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी चौहाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शहाजी शिंदे यांनी सादर केलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर विशेष सत्र न्यायालयाने आरोपी चौहाण याला दोषी ठरवत, तीन वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.