घराचा ताबा न देणा-या बिल्डरला तीन वर्षांचा कारावास, ग्राहक मंचाने सुनावली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 04:55 AM2017-12-03T04:55:02+5:302017-12-03T04:55:02+5:30
ज्येष्ठ नागरिक महिलेला हयात असेपर्यंत घराचा ताबा न दिल्याबद्दल व तिच्या वारसदारांच्याही तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत असलेल्या एका विकासकाला ग्राहक मंचाने तीन वर्षांचा कारावास व १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई : ज्येष्ठ नागरिक महिलेला हयात असेपर्यंत घराचा ताबा न दिल्याबद्दल व तिच्या वारसदारांच्याही तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत असलेल्या एका विकासकाला ग्राहक मंचाने तीन वर्षांचा कारावास व १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सात वर्षांपूर्वीच ग्राहक मंचाने विकासकाला तक्रारदाराला घराचा ताबा देण्याचा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाचा अवमान केल्याने व तक्रारदाराला घराचा ताबा देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल, ग्राहक मंचाने विकासकाला शिक्षा सुनावली.
पुत्तुबाई नाईक राहात असलेल्या चाळीचा विकास शशिकांत पाटील यांनी करण्याची तयारी दर्शविली. या जागेवर त्यांनी इमारत बांधली. मात्र, त्यानंतर, २०१२ मध्ये पुत्तुबार्इंचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मुलींनी वारसदार म्हणून घराचा ताबा मागितला, तसेच ग्राहक मंचाच्या आदेशाची पूर्तता न केल्याबद्दल ग्राहक मंचाकडे
धाव घेतली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घराचा ताबा देण्याचा आदेश ग्राहक मंचाने २०१० मध्ये देऊनसुद्धा विकासक घराचा ताबा वारसदारांना देत नाही, तसेच ग्राहक मंचाने भाडे म्हणून १ लाख ६५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. मात्र, विकासकाने केवळ एक लाख रुपये दिले.
त्यावर विकासकाने पुत्तूबाई नाईक यांनी त्या हयात असताना अधिक क्षेत्रफळाची मागणी केली व त्याबाबत म्हाडाकडे तक्रारही केली. त्यामुळे म्हाडाने विकासकाला भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे तक्रारादाराला घराचा ताबा दिला नाही, असा युक्तिवाद ग्राहक मंचाकडे केला. मात्र, ग्राहक मंचाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला. पुत्तूबाई नाईक यांनी म्हाडाकडे विकासकाविरुद्ध तक्रार केली होती, याचे काही पुरावे नाहीत. त्याउलट म्हाडाने विकासकाला भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या आठ बाबींची पूर्तता करण्यास सांगितली होती, त्या बाबींची पूर्तता केली की नाही, हे सिद्ध करणारे कागदपत्र विकासकाने सादर केले नाहीत, असे मंचाने विकासकाचा युक्तिवाद फेटाळताना म्हटले.
‘ताबा देण्याकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे ही आरोपीची (विकासक) जबाबदारी असल्याने, तो वर्षानुवर्षे स्वस्थ व निष्क्रिय बसू शकत नाही. यावरून असे म्हणता येईल की, आरोपीने हेतुत: मंचाच्या आदेशाची इतकी वर्षे पूर्तता केली नाही. त्यामुळे मूळ तक्रारदार पुत्तू नाईक हयात असताना, आपल्या घरात प्रवेश करू शकल्या नाहीत. त्यांचे वारसदारही ज्येष्ठ नागरिक आहेत. सात वर्षांचा अवधी उलटूनही मंचाच्या आदेशाची पूर्तता करण्यात आली नाही. आमच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. एक प्रकारे मंचाच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे, बेपर्वाई करण्यात आली आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अधिक शिक्षा देणे योग्य आहे,’ असे म्हणत, न्यायालयाने ३६ वर्षीय विकासकाला तीन वर्षे सक्त कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास, नऊ महिन्यांचा अधिक कारावास भोगावा लागेल, असेही ग्राहक मंचाने स्पष्ट केले. विकासकाने दंडाची रक्कम भरल्यास, त्यातील नऊ हजार रुपये तक्रारदाराच्या वारसदारांना देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला.