जिल्हा स्वच्छतेच्या उंबरठ्यावर
By admin | Published: July 2, 2015 11:20 PM2015-07-02T23:20:13+5:302015-07-02T23:20:13+5:30
रायगड जिल्ह्याने आतापर्यंत वैयक्तिक शौचालय बांधणीचे ६५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. २०१९ पर्यंत एक लाख ३० हजार २८३ शौचालये बांधून पूर्ण करण्यासाठी दिवसाला सुमारे ६० शौचालये बांधावी
आविष्कार देसाई , अलिबाग
रायगड जिल्ह्याने आतापर्यंत वैयक्तिक शौचालय बांधणीचे ६५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. २०१९ पर्यंत एक लाख ३० हजार २८३ शौचालये बांधून पूर्ण करण्यासाठी दिवसाला सुमारे ६० शौचालये बांधावी लागणार आहेत. मात्र येत्या दोन वर्षांतच जिल्हा हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. त्यामुळे मुदतीच्या आतच उद्दिष्ट गाठणारा जिल्हा अशी ओळख रायगडची होणार आहे.
रायगड जिल्ह्यासाठी २०१५-१६ या कालावधीत ४३ हजार ५८२ वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण करायची आहेत. त्यानंतर २०१६-१७ (३४ हजार ४२०), २०१७-१८ (३२ हजार ५६९), २०१८-१९ या सालापर्यंत २९ हजार ७११ वैयक्तिक शौचालयांची निर्मिती करायची आहे. जिल्ह्यासाठी तीन लाख ७२ हजार २४४ शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी दोन लाख ४१ हजार ९६२ शौचालये बांधली आहेत आणि अद्याप एक लाख ३० हजार २८२ शौचालयांचे काम पूर्ण करणे बाकी आहे. पाच वर्षांत ती बांधून पूर्ण करायची असल्याने दिवसाला सुमारे ६० शौचालये बांधावी लागणार आहेत. अशा पद्धतीने काम झाले तरच, दिलेले उद्दिष्ट गाठू शकणार असल्याने सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींनी त्या दिशेने कामकरणे गरजेचे आहे.
२०१५-१६ याकालावधीसाठी ४१ कोटी ४९ लाख ८४ हजार रुपयांची निधीची आवश्यकता आहे. कामे पूर्ण होतात. त्याप्रमाणे निधी वितरित केला जातो. एका शौचालयासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून १२ हजार रुपये अनुदान मिळते. यामध्ये भविष्यात वाढ होऊ शकते. सर्वच ग्रामपंचायतींनी त्याचप्रमाणे जनतेनेही आपला उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमासाठी द्यावा आणि आपला जिल्हा हगणदारीमुक्त करावा, असे आवाहन उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पुंडलिक साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना केले.
रायगड जिल्हा वैयक्तिक शौचालय बांधण्यात पुढे आहे. शौचालय बांधण्यासाठी मुळात जनतेची मानसिकता हवी. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. येत्या दोन वर्षांतच रायगड जिल्ह्याला हगणदारीमुक्त करण्यात येईल.
-दिलीप पांढरपट्टे, मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद