राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By Admin | Published: January 12, 2016 12:47 AM2016-01-12T00:47:17+5:302016-01-12T00:47:17+5:30
बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटाने अंतर्गत खदखदीमुळे पक्ष सोडण्याच्या निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. साधारण दहा नगरसेवक
ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटाने अंतर्गत खदखदीमुळे पक्ष सोडण्याच्या निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. साधारण दहा नगरसेवक त्यात असल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. पक्षाचा एक बडा नेताही या प्रकरणात अडचणीत आला आहे. त्यामुळे या फुटीला त्यांचा कितपत पाठिंबा आहे, याची चर्चा रंगली आहे.
परमार प्रकरणामुळे अडचणीत आलेल्यांना पक्षात कोणी वाली नाही, असे सांगत या नगरसेवकांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे वरिष्ठ नेते परमार प्रकरणाचा वापर करत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी करत असल्याची चर्चा आदीपासून रंगली होती. राष्ट्रवादीतील फुटीच्या चर्चेने तिला दुजोरा मिळाला आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुकीला वर्ष शिल्लक असतानाच पक्षातील अडचणीतील नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीप्रमाणे हा वेगळा मार्ग स्वीकारल्याचे समजते. परमार आत्महत्याप्रकरणात गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षातूनच गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असल्याने एक गट नाराज आहे. ठाण्यात शिवसेनेला तोंड देण्यासाठी भाजपने आधीच हालचाली सुरू केल्या आहेत. विजयÞी प्रभाग वाढविण्यात जेथे आपले नेते कमी पडत आहेत, तेथे अन्य पक्षातील नेते-नगरसेवक फोडून त्या जागा भरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास फुटीच्या तयारीतील नेत्यांना वाटतो.
परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांच्यावर राजकीय सूडबुध्दीने कारवाई होत असल्याचा आरोप या दोघांच्या समर्थक नगरसेवकानी केला आहे. राष्ट्रवादीने या प्रकरणात हात झटकले असून एकाही नेत्यांने नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांची विचारपूसही केलेली नाही. परमार यांच्या चिठ्ठीत सरकारी परवानगी देणारे, नातेवाईक, पार्टनरचा दबाव, अन्य पक्षांतील नेते, अधिकारी यांचा उल्लेख होता. पण त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा आग्रह कोणीही धरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील एका गटाला अडचणीत आणण्याची ही खेळी असल्याची या नगरसेवकांची भावना आहे.
बंडखोरांची येऊरला बैठक
पक्षात रहायचे की बाहेर पडायचे, प्रसंगी भाजपच्या आश्रयाला जाऊन अभय मिळवायचे का, याबाबत खलबते करण्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांची एक बैठक सोमवारी येऊरला झाली. पक्षाचे वरिष्ठ नेते सहकार्य करणार नसतील, तर आधी इशारा द्यायचा. त्यातून फरक पडला नाही, तर पक्षांतर करायचे यावर यावेळी चर्चा झाली.
महिनाभर वाट पाहून निर्णय घ्यावा, असेही या वेळी ठरविण्यात आले. यात दहा नगरसेवक सक्रिय असल्याचे समजते. पण ते ज्या गटाचे आहेत, त्या गटाचा बडा नेता अडचणीत येण्याची चिन्हे असल्याने तूर्त त्यांच्यातील एकही नगरसेवक जाहीरपणे बोलण्यास तयार नाही.