शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

By Admin | Published: February 19, 2015 12:48 AM2015-02-19T00:48:02+5:302015-02-19T00:48:02+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

On the threshold of Shiv Sena split | शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

googlenewsNext

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात नाईक व चौगुले ही गुरू-शिष्याची जोडी पुन्हा एकत्र दिसणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जावू लागले आहेत.
नवी मुंबईमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन व काँगे्रसच्या चार नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला असून, अजून काही जण प्रवेश करणार आहेत. पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात असताना माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना मात्र निर्णय प्रक्रियेमधून डावलले जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी रखडविण्यात आले. तिकीट दिल्यानंतर प्रचारासाठी एकही नेता ऐरोली मतदार संघात फिरकला नाही.
बेलापूर मतदार संघामध्ये अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांनी संयुक्तपणे जाहीरनामाही प्रसिद्ध केला नव्हता. जाणीवपूर्वक ऐरोलीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवडणूक काळात बोलले जात होते. निवडणुकीनंतर संघटनेमधील मतभेद वाढतच
गेले आहेत.
जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संघटनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले नसल्यामुळे चौगुले यांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षातील कोणीही या घटनेचे भांडवल केले नाही. परंतु स्वपक्षातील अनेकांनी जिल्हा प्रमुख पदावरून काढण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे अस्वस्थता वाढू लागली होती. यानंतर वाशीत झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर बसलेल्या चौगुलेंचा उल्लेख टाळून अवमान करण्यात आला होता. यामुळे नेरूळमधील मेळाव्यात त्यांनी व्यासपीठावर बसणे टाळले होते. निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नसेल तर पक्षात राहायचे कशाला? असा प्रश्न पदाधिकारी विचारू लागले आहेत. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला जात आहे. आयाराम - गयारामांचे नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा पुन्हा गणेश नाईकांचे नेतृत्व स्वीकारण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. चौगुले नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. येणाऱ्या काळात नाईक व चौगुले ही गुरू - शिष्याची जोडी पुन्हा एकत्र दिसणार काय, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

मी अजूनही शिवसेनेतच
च्माजी जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळातील काही घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. परंतु मी अद्याप शिवसेनेतच आहे. पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: On the threshold of Shiv Sena split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.