जल्लोष अन् प्रवेशाचा ताणही
By admin | Published: June 14, 2017 02:48 AM2017-06-14T02:48:20+5:302017-06-14T02:48:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या अफवांचे पीक आले होते. पण, अखेर मंगळवार, १३ जूनला दुपारी १ वाजता दहावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या अफवांचे पीक आले होते. पण, अखेर मंगळवार, १३ जूनला दुपारी १ वाजता दहावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला. या निकालानंतर मुंबई आणि उपनगरातील सर्वच शाळांमध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. यंदाचा सर्वच बोर्डांचा निकाल चांगला लागल्यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस वाढली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबतचा ताणही दिसून येत होता.
निकालामुळे सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील धाकधूक वाढली होती. त्यातच आधीच निकालाच्या तारखांबाबत बरीच अफवा पसरल्यामुळे शेवटी एकदाचा निकाल लागणार, याचा काहीसा आनंदही होता. दहावीचा निकाल हा आॅनलाइन जाहीर होणार असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी घरीच निकाल पाहण्यास पसंती दिली. एकाचवेळी अनेकांनी वेबसाईट लॉगइन केल्याने काही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास विलंब लागला. सर्वच जण एकत्र निकाल पाहत असल्यामुळे वेबसाईट हँग होत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. दुपारी ३नंतर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिल्याने मुंबईतल्या शाळा गजबजल्या होत्या.
चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षक, मुख्याध्यापकांची भेट घेतली. तर काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून सेलिब्रेशन केले. अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये, काही देवळांमध्ये गर्दी दिसून आली. विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण, त्याचवेळी आता प्रवेशाचे काय? ही भीती मनात डोकावत होती.
मी अभ्यासाचे वेळापत्रक बनवले होते; पण वेळापत्रकानुसार मला कधीच अभ्यास करता आला नाही. झोपडपट्टी परिसर असल्या कारणाने नेहमी परिसरात गडबड गोंधळ असायचा. छोट्याशा घरामध्ये आम्ही पाच जण राहतो. त्यामुळे घरचे वातावरण शांत नव्हते. बहुतांश वेळा मी रात्रीच्या वेळेस अभ्यास करायचे. मला पुढील शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे आहे. हे माझ्या घरच्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने घरातून अभ्यासासाठी जास्त मदत मिळाली नाही. जे उपलब्ध आहे त्यातच अभ्यास करून पुढे जात होती. - गुंजन तिवारी, ९१ टक्के, रवींद्र भारती हायस्कूल
दहावीच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली. परीक्षेच्या एक महिना अगोदरपासून दररोज ४ ते ५ तास अभ्यास केला. मला पालकांचा नेहमीच पाठिंबा होता. मला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे.
- सिद्धान्त कांबळे, ९९.६० टक्के, सेंट पॉल्स हायस्कूल
मी पाठांतरापेक्षा धडे समजून घेणे त्याचा अभ्यास करणे या गोष्टींवर भर दिला. दहावीच्या पहिल्या दिवसापासूनच मी दररोज ३ ते ४ तास अभ्यास करत होते. परीक्षा जवळ आल्यावर मी अभ्यासासाठीचा वेळ वाढवला. मागील काही वर्षांचे बोर्डाचे दहावीचे पेपर सोडवून सराव केला. हा सराव करत असताना टायमर लावून पेपर सोडवून पेपर वेळेच्या अगोदर सोडविण्याचा सराव केला.
- अपूर्वा प्रसन्न बाक्रे, ९८.६० टक्के, बालमोहन विद्यामंदिर
मी स्वत: अभ्यासाचे वेळापत्रक बनवले होते आणि वेळापत्रकानुसारच अभ्यास करत होते. अभ्यासासाठी फक्त शालेय पुस्तके वापरली. मागील काही वर्षांतील दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक महिना अगोदर सोडवल्या. गणित आणि विज्ञान विषयांवर अधिक भर दिला. मला पुढे जाऊ न सीए व्हायचे आहे. पोद्दार महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवायचा आहे.
- जान्हवी निशिकांत जंगम, ९८.८० टक्के,
बालमोहन विद्यामंदिर
दररोज पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करत होतो. मग दिवसा शाळा आणि क्लासेसला जात असे. त्यानंतर रात्री झोपण्याच्या पूर्वी एक तास अभ्यास करायचो. पुढचे शिक्षण विज्ञान शाखेत घेऊन डॉक्टर व्हायचे आहे. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असून, वडील सुतारकाम करतात आणि आई गृहिणी आहे. घरच्यांनी नेहमी घरातील वातावरण शांत ठेवले. त्यामुळे अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नसे. घरातून तासभर खेळण्याची परवानगी मिळत होती.
- दीपक शाह, ९१ टक्के,
एच.एम.डब्ल्यू. इंग्लिश हायस्कूल