भांडुपमध्ये चालत्या रिक्षात रंगला हत्येचा प्रयत्नाचा थरार; प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला
By मनीषा म्हात्रे | Published: October 16, 2023 01:42 PM2023-10-16T13:42:05+5:302023-10-16T13:42:42+5:30
लग्नासाठी तगादा
मनीषा म्हात्रे
मुंबई : प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागात प्रियकराने प्रेयसीला खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अंधेरीच्या हॉटेल मध्ये नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पुन्हा घराकडे परतत असताना चालत्या रिक्षाताच चाकूने मानेवर वार केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळीत घडला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रियकर चेतन कमलाकर गायकवाड (२७) याला अटक केली आहे. तरुणीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भांडुप परिसरात २१ वर्षीय तरुणी राहण्यास आहे. तिचे चेतन सोबत प्रेमसंबंध होते. दोघांमधल्या नात्यात अंतर आले. पुन्हा एकत्र येत लग्नासाठी चेतनने तगादा लावला. तो टेंभीपाडा येथील रहिवासी आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चेतनने तिला भांडुप मद्रास कॅफे येथे बोलावून घेतले. पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद होत, त्याने तरुणीला मारहाण केली. १४ तारखेला सायंकाळी चार वाजता एल बी एस रोड येथे बोलावून घेतले.
सोबत आली नाही तर जवळील खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणी बदनामीच्या भीतीने सोबत येण्यास येण्यास तयार झाली. रिक्षातून अंधेरीतील एका हॉटेल मध्ये नेले. तेथे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तेथून रिक्षाने भांडुपकडे निघाले. तरुणीचा नकार कायम असल्याने रिक्षा विक्रोळी गांधीनगर परिसरात येताच चेतनने सायंकाळच्या सुमारास जवळील चाकूने तरुणीच्या मानेवर वार केले. या घटनेने खळबळ उडाली. तरुणीने रिक्षा पार्क साईट पोलीस ठाण्यात वळवली. तेथील पोलिसांनी तिला भांडुप पोलीस ठाण्याकडे जाण्यास सांगितले.
तेथून तरुणीने भांडुप पोलीस ठाणे गाठले. तेथून पोलिसांच्या मदतीने तरुणीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहे. तरुणीच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी रविवारी आरोपी चेतनला बेड्या ठोकल्या आहेत.
तरुणीची प्रकृती स्थिर
तरुणीची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी तरुणीच्या माजी प्रियकराला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी सांगितले.