Join us

उलगडला मोटारसायकलवरचा थरारक परदेश प्रवास !

By admin | Published: April 21, 2016 2:59 AM

वयाची साठी उलटलेले मोटारबाइक रायडर आणि हाडाचे ट्रेकर असलेले सुभाष इनामदार यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून केलेला २४ हजार किलोमीटरचा युरोप आणि अमेरिकेचा थरारक

मुंबई : वयाची साठी उलटलेले मोटारबाइक रायडर आणि हाडाचे ट्रेकर असलेले सुभाष इनामदार यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून केलेला २४ हजार किलोमीटरचा युरोप आणि अमेरिकेचा थरारक प्रवास वसईच्या समर्थ रामदास सार्वजनिक वाचनालयात उलगडला आणि या अनुभवाचे साक्षीदार झालेले श्रोते मंत्रमुग्ध झाले. वसईमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्याचे व्रत घेतलेल्या या वाचनालयाच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुभाष इनामदार यांच्या ‘अनुभवाचे बोल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार राज चिंचणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुभाष इनामदार यांनी प्रथम युरोपमधील १७ देश त्यांच्या अ‍ॅव्हेंजर मोटारसायकलवरून पालथे घातले. १०० दिवसांहून अधिक काळ आणि १८ हजार ४०० किलोमीटरचा त्यांचा हा प्रवास होता. तुर्कस्तानातल्या अंकारापासून त्यांनी या मोहिमेला प्रारंभ केला आणि इस्तंबूल, बेलग्रेड, हंगेरी, जर्मनी, प्राग, बेल्जियम, बार्सिलोना, रोम, इटली ते अथेन्स इथे पोहोचून ही मोहीम फत्ते केली. एवढे करूनही ते स्वस्थ बसले नाहीत, तर अलीकडेच त्यांनी अमेरिका-कॅनडाची मनसोक्त भटकंती त्यांच्या या दुचाकीवरून केली. या प्रवासात तब्बल २४ हजार किलोमीटरचे अंतर त्यांनी पार केले. या एकूणच भ्रमंतीबद्दल ते म्हणाले की, शाळेत असल्यापासूनच मला ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड होती. तेव्हापासून मी दुचाकीच्या प्रेमात पडलो होतो; मग ती सायकल असो किंवा मोटारसायकल असो. मूळचा मी सांगलीचा आहे. आम्ही मित्र मिळून सायकलवरून नरसोबाच्या वाडीला नेहमी जायचो. पुढे कामाच्या निमित्ताने वसई येथे स्थायिक झाल्यावर मी वसई ते कोल्हापूर असा मोटारसायकलवरून प्रवास केला. त्यातून पुढे लेह-लडाख, तसेच नर्मदा परिक्रमा केली. त्यानंतर मी माझे पंख विस्तारायचे ठरवले आणि यातूनच मोटारसायकलवरून परदेश प्रवास करण्याची ऊर्मी आली. परदेश प्रवास करणे हे माझे स्वप्न होते आणि ते मी पूर्ण केले. पण या सगळ्यात माझी मोटारसायकल माझ्या बायकोची सवत झाली, कारण बायकोपेक्षा माझ्या मोटारसायकलवर माझे जास्त प्रेम आहे.या भटकंतीतला एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, नेवार्क बंदरात माझी मोटारसायकल विमानातून आली खरी; परंतु तिच्या वायर्स उंदरांनी कुरतडल्याचे लक्षात आले. त्या वेळी मी १४ किलोमीटर अंतर मोटारसायकल ढकलत नेऊन दुरुस्त करून घेतली. एकदा जंगली श्वापदांशी सामना करण्याची वेळही आली. असे प्रसंग त्यांनी श्रोत्यांशी शेअर केले. (प्रतिनिधी)